IFFI 2026 : गोवा बनणार जागतिक चित्रपटनिर्मितीचे केंद्र; मुख्यमंत्र्यांची फिल्मसिटीची घोषणा
८६ देश, १५० हून अधिक चित्रपट; इफ्फीच्या पडद्यावर जागतिक कथांचा उत्सव!
पणजी : जगभरातील विविध संस्कृती, भाषा आणि मानवी भावविश्वाला जोडणाऱ्या चित्रपटांचा उत्सव असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) गोव्यात दिमाखात उद्घाटन झाले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे झालेल्या शानदार उद्घाटन सोहळ्याने महोत्सवाला सुरुवात झाली. यंदाच्या महोत्सवात ८६ देशांतील १५० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून, ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ अर्थात ‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ ही यंदाची संकल्पना आहे.
उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला संपूर्ण चित्रपटनिर्मितीचे केंद्र बनविण्याचा राज्य सरकारचा संकल्प व्यक्त केला. चित्रपटांचे चित्रीकरण करण्यापासून ते त्यांची निर्मिती आणि पोस्ट-प्रॉडक्शनची प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंतच्या सर्व सुविधा गोव्यात उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा फिल्म शूटिंग कायदा २०२१, ऑनलाइन सिंगल विंडो परवानगी व्यवस्था आणि चित्रपट निर्मात्यांसाठीच्या आर्थिक सहाय्य योजनांचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील चित्रपटसृष्टीला बळकटी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्री-प्रॉडक्शन, पोस्ट-प्रॉडक्शन, व्हीएफएक्स आणि चित्रपट शिक्षणाच्या सुविधा असलेली फिल्मसिटी उभारण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली. अॅनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शन या नव्या तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ गोव्यातील तरुणांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘कथा सीमांच्या पलीकडे जाते’
अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनी यंदाच्या महोत्सवाच्या संकल्पनेचे स्वागत केले. विविध भारतीय भाषा आणि प्रांतांतील सुमारे ७०० चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना, भाषा किंवा भौगोलिक सीमा कोणत्याही असल्या तरी प्रेक्षकांना चित्रपटातील सत्य, भावना आणि प्रभावी कथा जोडून ठेवतात, असे त्यांनी नमूद केले. एका ठिकाणी जन्मलेली कथा जगाच्या दुसऱ्या टोकावरील प्रेक्षकांच्या मनातही घर करू शकते, हीच चित्रपटांची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी चित्रपट हे भारताच्या सांस्कृतिक प्रभावाचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगितले. इफ्फी हा केवळ चित्रपटांचा उत्सव नसून विविध संस्कृती, विचार, आठवणी आणि मानवी अनुभवांना एकत्र आणणारा मंच असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा रशिया आणि स्पेनचे विशेष चित्रपट विभाग तसेच ब्रिक्स देशांतील २१ चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

९ जागतिक, २४ आशियाई प्रीमियर
महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनी यंदाच्या ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेमागील भूमिका स्पष्ट केली. नकाशावरील सीमा केवळ देशांपुरत्या मर्यादित नसतात, तर अनेकदा आपल्या विचारांच्या आणि सवयींच्याही सीमा असतात. मात्र, चित्रपट अपरिचित भाषा आणि संस्कृतीतील माणसांशीही प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडतो, असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या महोत्सवात नऊ जागतिक प्रीमियर, दोन आंतरराष्ट्रीय प्रीमियर, २४ आशियाई प्रीमियर आणि ११६ भारतीय प्रीमियर होणार आहेत. नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यंदा ५२ महिला दिग्दर्शक आणि ६२ पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे.
उद्घाटन सोहळ्यात राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार तथा एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोव्याच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, गोव्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, एनएफडीसीचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह उपस्थित होते. अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या उपस्थितीनेही सोहळ्याला विशेष रंगत आली.
तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांच्या नेतृत्वाखालील सिंफनी ऑर्केस्ट्रा, विविध देशांतील कलाकारांचा सहभाग असलेला ‘म्युझिक विदाऊट बॉर्डर्स’ हा संगीत कार्यक्रम आणि इफ्फीच्या मोराच्या प्रतीकावर आधारित विशेष नृत्य सादरीकरण हे उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण ठरले.




