
काँग्रेसची २७ दिवसांची ‘गोंय राखण यात्रा’
२२ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘मांड’च्या माध्यमातून साधणार जनतेशी संवाद
पणजी : गोव्याची जमीन, पर्यावरण, संस्कृती, रोजगार आणि गोमंतकीयांचे भवितव्य या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत गोवा प्रदेश काँग्रेस समितीने २२ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान २७ दिवसांची ‘गोंय राखण यात्रा’ जाहीर केली आहे. राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा जाणार असून, जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे काँग्रेसने शनिवारी सांगितले.
दोनापावला येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष अल्टोन डी’कोस्टा, कार्लोस आल्वारेस फेरेरा, एम. के. शेख, सुनील कवठणकर तसेच मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. यात्रेचे संयोजक म्हणून युरी आलेमाव काम पाहणार आहेत.
३९ अ रद्द करण्याची पहिली स्वाक्षरी
काँग्रेस २०२७ मध्ये सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाची पहिली स्वाक्षरी कलम ३९ अ रद्द करण्यासाठी असेल, अशी घोषणा आलेमाव यांनी केली. गोव्याच्या हितापेक्षा काही विशिष्ट हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“गोमंतकीयांच्या आशीर्वादाने २०२७ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाची पहिली स्वाक्षरी ३९ अ रद्द करण्यासाठी असेल. गोमंतकीयांचे हित आम्ही इतर हितसंबंधांपेक्षा वर ठेवू,” असे आलेमाव म्हणाले.
यात्रेच्या माध्यमातून जमीन बळकावणे, डोंगरकापणी, भ्रष्टाचार, फसवणूक, बेरोजगारी आणि सरकारी नोकऱ्यांची कथित विक्री या मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधला जाणार असल्याचे आलेमाव यांनी सांगितले. “गोवा काही मोजक्या हितसंबंधींच्या ताब्यात जाऊ देणार नाही,” असा दावा त्यांनी केला.
शाश्वत पर्यटनावर भर
गोव्याच्या पर्यटन धोरणाबाबतही आलेमाव यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. अनियंत्रित पर्यटन विकासाऐवजी शाश्वत आणि दर्जेदार पर्यटनाला प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ब्रिटन आणि युरोपसह पारंपरिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून दर्जेदार पर्यटक गोव्यात आणण्यावर भर दिला जाईल, तसेच त्याचवेळी राज्याचे पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक जडणघडण यांचे संरक्षण केले जाईल, असे ते म्हणाले.
गोव्याच्या राजकीय इतिहासातील काँग्रेसच्या भूमिकेचाही आलेमाव यांनी उल्लेख केला. Opinion Poll, गोव्याला राज्याचा दर्जा आणि कोकणीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळवून देण्यात काँग्रेसचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपवर टीका करताना आलेमाव यांनी पक्षावर ‘फोडा आणि राज्य करा’चे राजकारण केल्याचा आरोप केला. गोव्याची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि राज्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेने काँग्रेसच्या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘मांड’ बनणार जनतेचे व्यासपीठ
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या म्हणण्यानुसार, ‘गोय राखोन यात्रा’ ही केवळ काँग्रेसची राजकीय सभा नसेल, तर जनतेचे म्हणणे ऐकण्याचे माध्यम असेल. गावे, शहरे आणि विविध भागांतून यात्रा नेऊन नागरिकांच्या समस्या, मते, अपेक्षा आणि भविष्यासंबंधीची भूमिका जाणून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पारंपरिक ‘मांड’ कार्यक्रमांना जनतेच्या संवादाचे व्यासपीठ बनवण्याची घोषणा चोडणकर यांनी केली. “जनता बोलेल, जनता चर्चा करेल आणि गोव्याचे भवितव्य जनता ठरवेल,” असे ते म्हणाले.
गोव्याची सामाजिक एकता, सांस्कृतिक वारसा, पर्यावरण आणि पर्यावरणीय समतोल यांचे रक्षण करण्यासाठी जनतेसोबत काम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल, असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले.
यात्रेचे मुख्य घोषवाक्य ‘गोय विकपाक दिवचे ना, भाजपाक जिकपाक दिवचेना’ असे ठेवण्यात आले आहे.
वरिष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे काही मुख्यमंत्री आणि युवा नेते यात्रेदरम्यान गोव्यात सहभागी होण्याची शक्यता पक्षाने व्यक्त केली आहे.
२ ऑक्टोबर रोजी साखळी विधानसभा मतदारसंघात गांधी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत यात्रेचे टी-शर्ट आणि अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओचेही अनावरण करण्यात आले.
गोव्याची जमीन, पर्यावरण, वारसा, संस्कृती, रोजगार आणि भवितव्याच्या प्रश्नांवर सर्व समाजघटकांनी एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. ‘गोव्याचे भवितव्य गोमंतकीयांनीच ठरवले पाहिजे’, हा यात्रेचा प्रमुख संदेश असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.







