…अन्यथा ‘बर्जर’चे स्थलांतर : मुख्यमंत्री
पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील बर्जर बेकर कोटिंग कंपनीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा अभ्यास करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
समितीने अहवाल दिल्यानंतर योग्य ती कार्यवाही सुरू केली जाईल. स्थानिकांसाठी ही कंपनी धोकादायक बनल्यास ती स्थलांतरित करण्यात येईल. गरज पडल्यास कारखान्याला दंडही ठोठावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी आज सभागृहात दिली.
विधानसभेत प्रश्नोत्तर तासानंतर आमदार मायकल लोबो यांनी हा विषय लक्षवेधीमार्फत मांडला. ते म्हणाले, बर्जर कंपनीच्या फॅक्टरीला लागलेल्या आगीमुळे आजही स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज पुन्हा या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली.
या फॅक्टरीच्या शेजारी अगदी ७० मीटरवर लोकवस्ती आहे. शिवाय आजूबाजूला गावे आणि वाडे आहेत. जेव्हा आग लागली, तेव्हा तेथून कार्बन मोनॉक्साईडसारखे मानवी जीवितास घातक आणि विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. याचा परिणाम इथल्या स्थानिक नागरिकांवर झाला आहे.
दरम्यान ही आग विझवण्यासाठी वापरलेला फोम आणि पाणी यांमुळे या भागातील विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. याशिवाय इथल्या जलस्त्रोतांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे यावर कायमची उपाययोजना करून ही फॅक्टरी या ठिकाणाहून अन्यत्र हलवावी. अन्यथा या स्थानिक लोकांचे स्थलांतर करावे.
याबाबत स्थानिक आमदार केदार नाईक म्हणाले, या फॅक्टरीमध्ये साठवण्यात येणारे रासायनिक पदार्थ नक्की किती आणि कोणते असावेत? याबाबतही निश्चित नियम नाहीत. टर्पेंटाईनसारखे घातक पदार्थ तिथे मोठ्या प्रमाणात ठेवले जातात. केवळ शॉर्ट सर्किटसारख्या प्रकारामुळे इतकी मोठी आग लागू शकते, यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे याची चौकशी करणे गरजेचे आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून याबाबत कायमचा तोडगा काढावा, असे लोबो म्हणाले.