
कोंकणी भाषा मंडळाकडून विविध पुरस्कारांसाठी आवाहन
मडगाव :
कोंकणी भाषा मंडळाने विविध साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तकांसह शिक्षक, पत्रकार, स्तंभलेखक आणि कार्यकर्ते पुरस्कारांसाठी शिफारशी मागवल्या आहेत. मंडळाच्या स्थापनेला यंदा ३० सप्टेंबर रोजी ६४ वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त २ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
यंदा रॉक बरेटो साहित्य पुरस्कार, श्रीधर कामत साहित्य पुरस्कार, रमेश वेळुस्कर साहित्य पुरस्कार, डॉ. मनोहरराय सरदेसाई बालसाहित्य पुरस्कार, रामनाथ मणेरकर अनुवाद पुरस्कार आणि फा. मोरेन डिसोझा युवा साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली कथा, कविता, नाटक, तियात्र, कादंबरी, एकांकिका, निबंध, संशोधन तसेच अनुवाद या प्रकारांतील पुस्तके पुरस्कारांसाठी पात्र ठरणार आहेत. देवनागरी आणि रोमन लिपीतील कोंकणी पुस्तकांचा विचार केला जाणार आहे.
लेखक किंवा प्रकाशकांनी आपल्या पुस्तकांच्या चार प्रती सचिव, कोंकणी भाषा मंडळ, कोंकणी भवन, शंकर भांडारी मार्ग, विद्यानगर, घोगळ, मडगाव, गोवा येथे २८ जुलै २०२६ पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन मंडळाचे सचिव मंगळदास भट यांनी केले आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार किंवा अन्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या पुस्तकांचा या पुरस्कारांसाठी विचार केला जाणार नाही. तसेच, यापूर्वी त्याच साहित्यप्रकारात कोंकणी भाषा मंडळाचा पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांच्या पुस्तकांचाही यंदा विचार केला जाणार नसल्याचे भट यांनी स्पष्ट केले.
याशिवाय फेलिसिओ कार्डोझ कोंकणी शिक्षक पुरस्कार (शालेय स्तर), माधवी सरदेसाई शिक्षक पुरस्कार (उच्च माध्यमिक, महाविद्यालय व विद्यापीठ स्तर), जुझे क्वाद्रोस कार्यकर्ता पुरस्कार, लिगोर फुर्तादो ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कार, चंद्रकांत केणी स्तंभलेखन पुरस्कार तसेच कोंकणी भाषा मंडळ सेवा पुरस्कार यांसाठीही शिफारशी मागविण्यात आल्या आहेत.
या पुरस्कारांसाठी उमेदवारांची नावे सुचविताना त्यांची सविस्तर माहिती शिफारशीसह सादर करावी, असे आवाहन कोंकणी भाषा मंडळाने केले आहे.







