लेख

‘संथ थंड संगाशी संग’बद्दल…

– डॉ. सुधीर रा. देवरे


‘संथ थंड संगाशी संग’ हा माझा सहावा कवितासंग्रह ‘शब्दालय प्रकाशना’ने जून २०२६ ला प्रकाशित केला, त्याबद्दल…

‘आदिम तालनं संगीत’ (अहिराणी), ‘डंख व्यालेलं अवकाश’, फुटूच लागतात पंख’, ‘भंग अभंग’, ‘पाय नसलेली माणसं’ आणि आताचा ‘संथ थंड संगाशी संग’ (मराठी) असे सहा कवितासंग्रह प्रकाशित. सध्याचा काळ हा प्रत्येकासाठी कठीण, सतत अस्वस्थ ठेवणारा आहे. जे विचार करत नाहीत, जे चिंतन करत नाहीत, जे आपल्यातच रममाण आहेत, ज्यांना समस्याच भेडसावत नाहीत, ज्यांना आतून समष्टीत उत्स्फुर्त असे काही येत नाही, ज्यांना सार्वजनिक व्यक्त व्हावेसे वाटत नाही, ते सर्व भाग्यशाली. आपले संपूर्णत्व, अपूर्णत्व, बांधिलकी, असणे, नसणे, सत्तेचा फास, व्यवस्था, देश, देव, धर्म, भाषा, प्रांत यातून ज्यांचे आत्मचरित्र घडत नाही ते सर्व सुदैवी लोक आहेत. ह्या संग्रहातल्या कवितांत घुसमटलेली मानवी मनस्थिती दिसेल. आजच्या काळात साहित्यिकांची भूमिका महत्वाची आहे. ती प्रत्येक सारस्वतात दिसायला हवी.


कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत रवींद्र लाखे म्हणतात, ‘कवी सुधीर देवरे हा प्लान्ड म्हणजे सुरचितपणे जगणारा कवी नाहीये. तो जागच्या जागी ठाम कवी आहे. त्याची मूर्ती उचलून तिची प्रतिष्ठापना कुणी हव्या त्या ठिकाणी करू शकत नाही. एका कवितेत राणी माशीचा उल्लेख आहे. समष्टीच्या दृष्टीकोनातून पाहिलं की राणी माशी ही एक सत्ताच असते. एखादी अस्मिताही राणी माशी वाटावी अशा या जमान्यात तिला कवितेतून ओळखणं हे विलक्षण आहे… ही कविता दुसऱ्या कुणाच्या किंवा मराठी कवितेशी स्पर्धा करायला निघालेली नाही किंवा देवरेंना आपल्या कवितेचं मराठी कवितेतील स्थान पक्क वगैरे करायचं नाहीये. मनाच्या संरचनेशी कवितेनं अनुनाद साधला पाहिजे अशा धारणेचे हे कवी आहेत. स्वत:शी प्रामाणिक राहण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजे हा कवितासंग्रह… यातल्या प्रत्येक कवितेवर स्वतंत्र भाष्य करता येईल इतक्या त्या मौलिक आहेत… स्वतःच्या जगण्याशी जुळवून घेत असतांना, स्वतःशी प्रामाणिक राहणं कठीण जायला लागलं की कवितेचं बीज मनात निर्माण होतं. ‘संथ थंड संगाशी संग’ हा कवितासंग्रह अशाच एका पोकळीत बीजरूप जन्माला आलेला आहे… हा संग्रह म्हणजे हळूहळू, वर्षानुवर्षे साचत गेलेल्या अनुभवांचा गाळ आहे. बाह्य आयुष्य चालू असतानाही आत कुठंतरी ठप्पपणाची भावना राहणं; बोलण्यातून, कृतीतून निभावून नेलेलं आयुष्य आणि मनात चाललेला वेगळाच संवाद, या दुभंगातून कवीचा मानसिक प्रवास सुरू होतो. या कविता त्या दुभंगाच्या नोंदी आहेत… शरीर आणि मन यांच्यातला ताण हा या प्रवासाचा दुसरा स्तर आहे आणि तो अधिक मूक आहे. कवीच्या जाणिवेत एक टप्पा असा येतो, जिथं हे स्पष्ट होतं की मानसिक स्थिती ही केवळ विचारांची नसते, ती देहातही उतरते. काही कविता या समजुतीतून येतात, जिथं वेदना व्यक्त होत नाहीत, पण स्वीकारल्या जातात… आत्मिक पातळीवर हा संग्रह आतल्या आत स्वतःशीच चाललेल्या संघर्षातून स्वतःचाच स्वीकार झालेल्याची नोंद आहे. पण इथं स्वीकार म्हणजे शरणागती नाही. तो एक प्रगल्भ निर्णय आहे… या स्वीकारातूनच ‘थंड’पणा येतो, भावनांपासून दूर न जाता भावनांमध्ये न अडकण्याचा… ‘संगाशी संग’ हा या संग्रहाचा केंद्रबिंदू आहे. या शब्दसमूहात आधार, सोबत किंवा आश्रय यांचा आग्रह नाही. इथं संग म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाशी चालण्याची तयारी. स्वतःपासून पळण्याऐवजी स्वतःशी थांबण्याचं धैर्य… या कवितांमध्ये अध्यात्मिक घोष नाहीत, तत्त्वज्ञानाचे संदर्भ थेट दिलेले नाहीत. तरीही या संग्रहाचा स्वभाव गाभ्यानं तत्त्वज्ञानात्मक आहे, कारण तो ‘कसं जगावं?’ याचं उत्तर देत नाही, तर ‘जगणं सहनशील कसं बनतं?’ हा प्रश्न उघडा ठेवतो. इथं कविता ही साधन नाही; ती एक अवस्था आहे, मनाच्या आणि आत्म्याच्या मधली… आजच्या मराठी कवितेच्या संदर्भात पाहिलं तर ‘संथ थंड संगाशी संग’ हा संग्रह कोणत्याही ठळक प्रवाहात स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करत नाही, तर जाणीवपूर्वक कमी बोलणारी भूमिका घेतो… संकोच, थांबा आणि अंतर्मुखता यांचं साहित्यिक महत्त्व अधोरेखित करतो… आतल्या वास्तवाला कवितेचं क्षेत्र मानतो. तो अनुभव इतक्या प्रामाणिकपणे मांडतो की वाचकाला स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं… या अर्थानं या कविता आजच्या मराठी कवितेत एक वेगळी, पण आवश्यक जागा घेतात, जिथं कविता पुन्हा एकदा मनःस्थिती बनते, विधान नाही; प्रक्रिया बनते, निष्कर्ष नाही… आरशासारख्या तर काही शांत सावलीसारख्या या कविता आहेत… हा कवितासंग्रह लेखकाच्या मानसिक- आत्मिक प्रवासाचा दस्तऐवज नाही; तो त्या प्रवासात निर्माण झालेलं मौन आहे… या कवितेतला बोलकेपणा या कवितासंग्रहाला दिलेल्या शीर्षकासारखा आहे. ‘‘संथ थंड संगाशी संग”. यात असंगाशी संग हा ध्वनी जास्त जोरात बोलतो. यातला संथ हा शब्द आहे तो अती वेगात दिसणाऱ्या स्तब्धतेशी आहे. भवताल स्वत:त इतका रमला आहे की तो प्रतिसाद देत नाही, त्या अर्थानं त्याचा संग थंड आहे. असे शब्दांच्या बाहेर नेणारे ध्वनी संग्रहभर सापडतात.’ (अतिसंक्षिप्त).

या कवितेबद्दल सायमन मार्टिन म्हणतात, ‘बोलीभाषा आणि लोकसाहित्याच्या अभ्यास- संशोधनामुळं देवरे यांची स्वतःची भूमिका तयार झालेली आहे, तीच स्पष्ट, परखड मानवतावादी भूमिका ते आपल्या लेखनातून आणि समाज माध्यमांवरील प्रतिक्रियांमधून सतत निर्भिडपणे मांडत असतात. साहित्यिकाला भूमिका असावी असं त्यांचं म्हणणं आहे. आजच्या काळाला त्यांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे या कविता आहेत… या संग्रहातील कविता समग्र मानवाशी संपर्क साधू इच्छिते. ती निसर्ग आणि विश्वाला कवेत घेते. आपण ज्या भवतालात जगत आहोत त्यातील जाणिवांचा वेध घेत ही कविता येते. भौगोलिकतेच्या सर्व सीमा, तसेच धर्म, भाषा, वंश आणि आजचा टोकाचा राष्ट्रवाद या सर्व विचारधारा ओलांडून ही कविता पुढं जाते. म्हणून अशा कवितेचा आपण ध्यास आणि वेध घेतला पाहिजे. कवितेचा मुख्य उद्देश मानवसमूहाला एकत्र करणं हाच असला पाहिजे. त्या अर्थानं कवितेनं आपल्या सांप्रत काळाबद्दल बोललं पाहिजे. तत्कालीन परिस्थितीबद्दल स्पष्ट विधान केलं पाहिजे. चिरंतन मूल्यांचा पाठपुरावा केला पाहिजे… आजच्या भोगवादाचं जळजळीत वास्तव मांडणारी ही कविता आहे.  कविता हा असा उद्‍गार आहे जो आम्हाला माणूसपणाची दीक्षा देतो. आमच्या कवितेनं काळाला प्रतिसाद द्यावा. उत्तम कविता कायम हस्तक्षेप करीत असते. आजच्या अस्वस्थ वर्तमानाला शब्दांकित करण्यासाठी नवीन भाषा आणि नवीन शब्दप्रयोगाची आवश्यकता आहे. जुनी प्रतिकं आणि प्रतिमातून बाहेर पडून या काळाला उत्तर देईल अशा भाषेची गरज आहे. ती गरज या संग्रहातून पूर्ण झालेली पाहायला मिळते. या कवितेत कवी आपल्या काळाची साक्ष देतो. ज्या कवितेत सर्व प्रकारच्या कुरूपतेबद्दल विधान केलेलं असतं आणि परिस्थितीचं स्पष्ट दर्शन घडवतं, ती उत्तम कविता. म्हणून ही कविता उत्तम आहे… कवीनं सत्तेच्या वाऱ्याला उभं राहू नये. ज्यांनी सत्याचा बाजार मांडलेला आहे, अशा असत्याला आव्हान देण्याचं काम कवितेला करायचं आहे… जंगल नष्ट होणं, बाग उध्वस्त होणं, पक्षी, प्राणी, पर्यावरण संपून जाणं आणि माणूसपणाचा ऱ्हास होण्याच्या काळात कविता हा एकमेव सर्वकाही पुनर्स्थापित करण्याचा मार्ग असतो. देवरे यांच्यासारखे कवी तो मार्ग चोखाळत आहेत… वैयक्तिक दुःख आणि वेदनेला कवटाळून न बसता एका सुंदर जगाचं स्वप्न पाहणारी कविता घेऊन येत आहेत, म्हणून सुधीर देवरे यांच्या कवितांचं स्वागत.’ (अतिसंक्षिप्त).

ब्लर्बवर (पाठराखण) शरणकुमार लिंबाळे या कवितेविषयी म्हणतात, ‘संथ थंड संगाशी संग’ ह्या कवितासंग्रहात सुधीर देवरे यांनी ठरवून भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांची ही भूमिका मानवधर्माची पाठराखण करणारी असून आगळ्या वेगळ्या संवेदनशीलतेने चित्रमय दृश्यात ती आविष्कृत होते… समकालीन उलथापालथीच्या काळात विचारी माणसाची वाढत जाणारी अस्वस्थता, सामाजिक, राजकीय चिंतन, मानवीय समष्टी समस्यांतून भूमिकांची उत्स्फुर्तता, अभिव्यक्तीतील सार्वजनिकपण, संपूर्णत्व की अपूर्णत्व, सामाजिक बांधिलकीतील असणे- नसणे, सत्तेची नशा, देश, देव, धर्म, व्यवस्था, प्रांत, भाषा यातून कवीचे आत्मचरित्र घडत जाते की बिघडत जाते. अशा सर्वांगिण भूमिका घेत व्यवस्थेच्या भोवाड्यात नेमके कोणते सोंग कसे वठवावे- नाचवावे, हा प्रश्न संग्रहभर अगम्य संगीतात आत्मनिष्ठतेतून समष्टीत निनादत राहतो. सुधीर देवरे यांच्या कविता वाचकाच्या मनन- चिंतनाचा विषय होत कालातीत महाकाव्यासारख्या सलगपणे सर्वदूर कायम वाचल्या जातील!’


या संग्रहातील ३ कविता (निवडून नव्हे) मुद्दाम रसिकांसाठी देत आहे :

तळघरातला कलश

माझ्या
स्वर्गाची
वाट
तुझ्या
गाभाऱ्यातून जाते…
आता तरी
उघड दार
कुष्टाळ्यातला
अभिषेक संपण्याआधी…
तुलाही सहज
प्रसन्न होईल
हातोहात साक्षात
किल्लीतला स्वर्ग,
माझ्या तळघरातला
कलश
शुचिर्भूत होता होता…
*


वाजत असतं आतही

ढग वितळताना
आपण काहीच करत नाही,
अ‍हर्निश
भोगत असतो पाऊस,
ज्ञानेंद्रियेही बुडून जातात
जलधारांच्या मिठीत,
तरी दिवस वाया जात नाही…
कारण पाऊस म्हणजे
कविताच असते,
मनात असो,
काळजात असो
वा मेंदूत,
पाऊस घराबाहेरच
कोसळतो असं नाही…
‘आदिम तालनं संगीत’
अविरत
वाजत असतं आतही…
*


निखळ आनंद

परस्पर कुठला पुरस्कार जाहीर होत नाही
म्हणून निखळ आनंद होत नाही.
परस्पर विद्यापीठात अभ्यासक्रमात लागत नाही
म्हणून निखळ आनंद होत नाही.
प्रथितयश सार्वजनिक भलावण करत नाही
(खाजगीत करतो तशी)
परस्पर प्रसिध्दी धाऊन येत नाही
(भाषणांसाठी खंडीभर निमंत्रणं,
पण शब्दांच्या चोथांचा उपयोग काय?)
आयुष्यभर फक्त अस्वस्थ होत रहायचं
भोगलेलं लिहीत बसायचं…
वेदना सोसत कन्हायचं…
कधीतरी कोणीतरी वजनरहीत वाचकानं
वाचल्याचं कळवलं की
निखळ आनंदात रमायचं!


‘संथ थंड संगाशी संग’ (कवितासंग्रह)
सुधीर राजाराम देवरे
शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.
पृ. संख्या, १८२, किंमत : ३२५ रूपये.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!