
‘बंडखोर’चा टीझर प्रदर्शित; सहा अभिनेत्रींच्या दमदार भूमिकेची झलक
मुंबई : गोव्याचे प्रसिद्ध उद्योजक संजय शेट्ये निर्मित आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी मराठी चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. ‘बंडखोर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातून सहा महिलांच्या संघर्षाची आणि त्यांच्या बंडखोर वृत्तीची झलक पाहायला मिळत आहे. हा चित्रपट २४ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘बंडखोर’मध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या अभिनेत्री प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. टीझरमध्ये या सहा महिला एकत्र आल्याचे पाहायला मिळते. मात्र, त्यांच्या आयुष्यात नेमके काय घडले आहे आणि त्या कोणत्या परिस्थितीविरोधात उभ्या ठाकल्या आहेत, याचा उलगडा अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे चित्रपटाच्या कथेबाबतची उत्सुकता वाढली आहे.
स्त्री म्हणजे केवळ परिस्थितीशी जुळवून घेणारी किंवा तडजोड करणारी व्यक्ती नसून, प्रसंगी स्वतःच्या अस्तित्वासाठी परिस्थितीविरोधात आवाज उठवणारी व्यक्तीही आहे, हा विचार चित्रपटातून मांडला जाणार असल्याचे टीझरवरून दिसते. परिस्थितीसमोर शरण न जाता त्याला सामोरे जाणाऱ्या सहा महिलांची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाबाबत बोलताना ‘बंडखोर’ हा केवळ महिलांसाठीचा चित्रपट नसल्याचे म्हटले आहे. या सहा स्त्रियांच्या आयुष्यातील प्रश्नांमध्ये अनेकांना आपल्या आजूबाजूच्या महिलांचे प्रतिबिंब दिसू शकते, असे त्यांनी नमूद केले आहे. प्रत्येक स्त्रीची परिस्थिती आणि त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची पद्धत वेगळी असते, हा मुद्दाही चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
टीझरमुळे चित्रपटाच्या कथानकाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, या सहा ‘बंडखोर’ महिलांची नेमकी कहाणी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आता २४ सप्टेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.





