google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

अस्तित्वाच्या दोलायमान अवस्थेच्या कविता…

– सचिन दिलीप अहिरे

डॉ. सुधीर राजाराम देवरे यांचा ‘फुटुच लागतात पंख’ हा कवितासंग्रह म्हणजे मानवी अस्तित्वाच्या जीवन जाणिवांचा वस्तुनिष्ठ आविष्कार आहे. हा कवितासंग्रह वाचताच मी पुस्तक परीक्षणासाठी उद्युक्त झालो याचे श्रेय या पुस्तकाला देत आहे. एखाद्या संपूर्ण पुस्तकावर लिहिलेले हे माझे पहिले लिखाण आहे. या पुस्तकाचे परीक्षण करण्याइतका माझा अभ्यास नाही. म्हणून एका सामान्य वाचकाची प्रतिक्रिया या अर्थाने मी लेख लिहायचे धाडस करीत आहे.

या कवितासंग्रहात १९८० ते २०२१ पर्यंतच्या म्हणजे ४० वर्षांतील निवडक कवितांचा समावेश असून संग्रहात एकूण १७५ कविता आहेत. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या, भावभावनांचा अनोखा मेळ घालणाऱ्या, भावना उद्विग्न करणाऱ्या, मनाचा ठाव घेणाऱ्या, समकालीन जीवन जाणिवांची आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या, भूतकाळाचा वर्तमानाशी आणि वर्तमानाचा भविष्याशी सहसंबंध जोडणाऱ्या, आकलन होणाऱ्या व दृष्टीच्या कक्षेबाहेर असणाऱ्या, प्राणी सृष्टीचा मूल्यर्‍हासाच्या अगतिकतेबरोबरच, मर्मभेदी, काळ्या विनोदाच्या अंगाने आविष्कृत होणार्‍या, भयावह, वेदनादायी अंतस्वर असलेल्या आणि उपरोधिक भाषेची जडणघडण दर्शविणाऱ्या आहेत. क्रिया-प्रतिक्रिया, परखडपणा, संयम, दुखरेपण, सोशीकता, अनेकार्थता, वास्तव, उपरोध आणि निषेध यांचा शाब्दिक कलात्मक खेळ या कवितासंग्रहात कवीने अलगद मांडला आहे.

डॉ. सुधीर देवरे यांच्या काव्यानुभूतीत विलक्षण जिवंतपणा दिसून येतो. काही ठळक कवितांवर या लेखात मी भाष्य करण्याचा प्रयत्न करतो : ‘रुतत जातो खोल’ या कवितेच्या ओळी समाजाचं वास्तव चित्र दाखवतात. तर आपल्या-
‘भोवती ग्रंथालयातील पुस्तकांचा उखडा करुन
संशोधनाला बसलेला माणूस वाजत गाजत
ऐकू येतो रोज; आणि मी
एकेक जखम पाहतो
एकेक बोल ऐकतो
एकेक चिटोरे लिहितो-
परंपरेतून आधार काही सापडत नाही…’

समाजाचं वास्तव चित्र रेखाटताना कवीने या ओळी उद्गारलेल्या दिसून येतात. आपल्याजवळ सर्व असताना देखील आजचा समाज कष्ट न करता- श्रम न करता अधिक हव्यासाने जगू पाहतोय. हे भीषण सत्य कवी मांडू पाहतात. मात्र एका बाजूने खंत व्यक्त करत असताना देखील दुसरी बाजू अधिक उद्विग्नतेने ते मांडताना दिसतात.

‘पागल’ या कवितेत कवीने स्रीच्या मनातील वेदना चित्रीत केलेल्या दिसून येतात,
‘ती लहान मुलासारखी हरवून जाते
तिच्या फटफटीत कपाळाच्या कथा सांगताना.
————————
पण तुडुंब भरलेल्या आयुष्याचा बांध फुटायला
आज एवढंच कारण झालं
त्याच्या शौर्यकथा ऐकवित असताना
म्हणे, कोणीतरी तिला पागल म्हटलं!’

स्री मन, स्रीच्या भावना, स्रीच्या मनातील तडफड व्यक्त करताना समाज- परंपरेची- लोकसंस्कृतीची आठवण करून देतात. आपल्या पतीच्या शौर्य कथा सांगणाऱ्या स्रीच्या माध्यमातून कवी मानवी एकनिष्ठा दाखवतात. पती-पत्नीच्या नात्याचे बंध उलगडून दाखवतात. शेवटची ओळ मनाला चटका लावून जाते. फाशीची शिक्षा झालेल्या आपल्या पतीच्या गौरव कथा सांगताना कुणी तिला पागल म्हणणं ही भयानक कलाटणी कवितेला मिळते.

‘राजा’ या कवितेत मला आजच्या राजकारणातल्या विविध पक्षांचा अनुबंध दिसला आणि घराणेशाहीवर खोचक टीका देखील केलेली दिसून येते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रत्येक घराणेशाहीची सत्ता आणि या घराण्यातीलच वंशज सत्ता उपभोगतांना दिसतात. मग ही लोकशाही आहे की राजेशाही? आजच्या समकालीन राजकारणाचे हे वास्तव उपयोजन आहे का? कडेकोट बंदोबस्तात असणारे, आजचे राजकारणी दहशतवादावर फक्त भाषण ठोकतात तेही झेड सुरक्षेत… आणि जनता देखील त्यांच्या इशाऱ्यांवर बहकणारी… या कवितेतला हा मला भावलेला अर्थ आहे. कवीच्या मनातला अर्थ वेगळा असू शकतो.

ही समग्र कविता वास्तवाची भीषणता दर्शविणारी व समाज सामंजस्याचे तुटलेपण अधोरेखित करणारी आहे. या काव्यसंग्रहातील कवितांत बरीच गूढता दडलेली दिसून येते. काही सोप्या कविता वगळल्या तर बाकी कविता जितक्या वेळेस वाचल्या तितक्या वेळेस नवीन अर्थबोध होतो. अशी ही अनेकार्थ असलेली व्यंजनात्मक कविता आहे. मानवी मनाच्या विविध भावभावनांचा कल्लोळ या संग्रहातील कवितेतून अनुभवता येतो.

या समग्र कविता मनाला भिडणाऱ्या, मानवी मनाचं चित्रण करणाऱ्या, मानवी आयुष्याच्या विविध अंगांना स्पर्श करणार्‍या आहेत. सामाजिक पैलूंना उलगडणारी अशी ही समाजाभिमुख कविता म्हणता येईल. वास्तव आणि अस्तित्वाचे दर्शन काव्यभाषेतील अर्थवलयांत दिसून येते. तसेच बहुतांशी कविता स्थळ, काळ, परिवेश व लोकसंस्कृतीचा आरसाच म्हणाव्या लागतील इतक्या सखोलपणे प्रतिबिंबीत झाल्या आहेत.

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4781398541784045997?BookName=Futuch-Lagtat-Pankh

‘फुटूच लागतात पंख’ या कवितासंग्रहातील कवितांचा परामर्श घेतल्यास असे जाणवते की, कवीची समाजाप्रती, लोकसंस्कृतीप्रती, गावाप्रती, माणसाप्रती असलेली तळमळ, अगतिकता, प्रामाणिक खंत, सच्चेपणा, प्रभावीपणे मांडण्याची लकब, साधी, सोपी आणि सुबोध भाषा कवितेला अधिक अर्थग्राही आणि अर्थप्रवाही बनवते. त्यांच्या काव्यानुभूतीत विलक्षण जिवंतपणा आढळून येतो. आजच्या काळातील वास्तवाची भीषणता दाखवणारा हा काव्यसंग्रह आहे.

या कवितासंग्रहातील कवितांची समीक्षा करणे, पुस्तक परीक्षण करणे, परिचय करून देणे वा रसग्रहण करणे ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नाही. तसे करायचे झाले तर त्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागणार आहे, कारण या कविता खूप अर्थप्रवाही आहेत असे मला जाणवते. म्हणून तूर्त तरी मी केलेल्या परीक्षणाचे काही ठळक निरीक्षणे- मुद्दे- निष्कर्ष पुढे मांडत आहे.

या कवितेत प्रामुख्याने रस्ते, वाटा, वळणे, पांदी, झाडे, घर, दार, माणसं, अस्मिता अशा प्रतिमा वेगवेगळ्या अर्थाने येत राहतात. प्रतिके आणि रूपकेही अभिनव पध्दतीने आविष्कृत होतात. वेदना, एकटेपणा, परकेपणा, तुटलेपण, उपरेपण, अपुरेपण आदी जाणिवा व्यक्त होत राहतात. लोकश्रध्दा, लोकसमज, लोकपरंपरा आदी लोकसंस्कृती तर स्त्री जाणीवेसह भाषा, बोलीभाषा, अहिराणी आदी बाबी उपयोजित होतात. बहुतांशी कवितांमध्ये अल्पशब्द असताना देखील समृद्ध असा अर्थ त्यातून बोधित होतो हे या कवितांचे विशेष म्हणावे लागेल. सत्य आणि अस्तित्व यांच्या दोलायमान अवस्थेचा परिपाक म्हणजे हा कवितासंग्रह. यातील कवितांचा परामर्श म्हणजे मानवी अस्तित्वाच्या जीवन जाणिवांचा वस्तुनिष्ठ आविष्कार होय. समाजातील सत्यस्थिती व समाजाचे चित्र डोळ्यासमोर उभी करणारी व जीवन जाणिवेचे अमोघ अमृत पाजणारी ही कविता आहे.

पुस्तक – फुटूच लागतात पंख
कवी – डॉ. सुधीर राजाराम देवरे
प्रकाशक – सहित प्रकाशन, गोवा
पृष्ठ – १६९
किंमत – २०० रुपये

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4781398541784045997?BookName=Futuch-Lagtat-Pankh

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!