माझा ‘मृत्यु’नंतरचा जन्म !
- वामन प्रभू
३० सप्टेंबर १९७३. नवरात्रातील बहुधा चौथा दिवस. रविवारची दुपार. स्थळ काणकोण तालुक्यातील मोखर्ड हे तळपण नदीच्या काठावर डोंगरांच्या कडेकपारीत वसलेले लहानशे गाव . गावातील दोन तीन मोठ्या घरांचा अपवाद सोडल्यास पंचवीस तीस छोटेखानी घरांनी वसलेले हे त्यावेळचे खेडेच. तळपण नदीच्या काठावरील नारळीच्या बागानी या घरांना दिलेली छानशी झालर हेही या गावाचे वैशिष्ट्य. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला हा परिसर. माझ्या मामाचा हा गाव असल्याने साहजिकच अगदी लहानपणापासून या गावाची ओढ. मामाच्या गावाला जाण्याची येणारी संधी सोडायची नाही आणि मामाकडे ञाण्याकरिता संधी कशी ऊपलब्ध होऊ शकेल याकरिता वाट्टेल ते करायची तयारी. याचा नंतरच्या काळातही मला चांगला ऊपयोग होत गेला आणि आज वयाच्या पंचाहत्तरीच्या दरवाजावर थाप देण्याची लगबग असतानाही या गावाकडील माझी ओढ किंचितही कमी झालेली नाही हे तेवढेच खरे. मामाचा , आत्याचा आणि आता सासरचाही असलेल्या या गावात तब्बल पन्नास वर्षांआधी माझ्या जीवनात घडलेल्या एका घटनेचे वर्णन नेमके कोणत्या शब्दात करावे हे कळत नाही. तो माझा ‘मृत्युनंतरचा जन्म’ होता असे जसे म्हणता येईल तसेच माझा तो ‘ पुनर्जन्म ‘ होता असेही मी म्हणू शकेन. मला दुसरी जन्मतारीख देणारा तो दिवस ठरला आणि त्यानुसार आज माझी सुवर्णमहोत्सवी ‘ सेकंड इनिंग ‘ पुरी करत असून त्याचे सारे श्रेय तेथील कुष्टा भंडारी या व्यक्तीकडे जाते. आई-वडीलानी मला पहिला जन्म दिला तर पन्नास वर्षांआधी मला माझ्या ‘ मृत्यु”नंतर नवा जन्म दिला तो कुष्टा भंडारी यानेच असे मी मानतो आणि पन्नास वर्षांची जी नवी इनिंग नंतर मी खैळलो नि अजून खेळत आहे त्याबद्दल त्याच्या ऋणात मी कायमचा आहे .
पन्नास वर्षांआधीची ही घटना आजही जशीच्या तशी डोळ्यांसमोर तरळते आणि त्यावेळचा प्रत्येक क्षण नि क्षण मी नव्याने अनुभवतो. पन्नास वर्षे मागे जाताना सर्वप्रथम डोळ्यांसमोर कोण येत असेल तर आमच्या थोरल्या मामी ज्यांना आम्ही सगळीच भावंडें ‘ व्डडली मामी ‘ म्हणूनच हाक मारायचे. आम्हा भावंडांना दोन मामा त्यातील हा ‘व्हडलो ‘ मामा तर धाकटा मामा आणि धाकटी मामी हे वेगळेच रसायन. दुर्दैवाने आज यातील कोणीही हयात नाही. मामाकडे राहूनच पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण मोखर्ड येथील अश्वत्थ नारायण विद्यालयात ( १९५७ ते १९६० ) घेतल्याने दोघाही मामाशी माझे चांगले जुळत होते आणि तीच ओढ अखेरपर्यंत कायम राहिली. माझा मामेभाऊ म्हणजे ‘व्डडल्या’ मामाचा मुलगा दीपक हा माझ्यापेक्षा तेवीस वर्षांनी लहान. त्याचा पहिला वाढदिवस आला तेव्हा ‘ गोमंतक ‘ मध्ये उपसंपादक म्हणून काम करायचो. गोमंतकमध्ये त्या काळात रविवार आवृत्तीत ‘ बाळाचा वाढदिवस ‘ या शिर्षकाखाली लहान मुलांचे फोटो प्रसिद्ध केले जात असत आणि ह्या सदरात आपल्या मुलाचा फोटो प्रसिद्ध व्हावा असे प्रत्येक पालकाना वाटायचे. मामीने तर ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मामाकडे जाण्याची चालून आलेली ती संधी मी दवडणे शक्यच नव्हते. मामा, आत्या यांच्याबरोबरच तेथील आणखी एका घराशी माझे संबंध जुळू लागले होते आणि तारुण्यसुलभ मी तेथे खेचला जायचो. मामीची आज्ञा शिरसावंद्य मानून कॅमे-यासह मी मोखर्डला पोचलो तेव्हा त्यादिवशी माझ्यासाठी तो सारा गाव रडेल याची स्वप्नातही मी कल्पना करू शकलो नसतो.
मोखर्डला पोचलो की गावातून वाहणाऱ्या तळपण नदीच्या पात्रात मनसोक्त डुंबणे , पोहणे, मस्ती करणे हे नित्याचेच होते. त्यामुळे तेथे पोचल्यानंतर त्याकरिता अन्य भिडू जमवणे आणि नंतर एकत्र पाण्यात ऊड्या घेणे हा क्रम ठरलेला होता. यावेळीही तेच झाले आणि एकूण दहा बारा जण पोहण्यासाठी नदीवर पोचले. यात सिनिअर आणि पट्टीचे पोहणारे तिघेच असल्याने ईतराना कंबरेपर्यंतच्या पाण्यात सोडून आम्ही नदीच्या पात्राची पैलतड गाठली जेथे पाण्याची पातळी पोहणा-यांसाठी सदैव एक आव्हान असायची. सप्टेंबरची अखेर म्हणजे पावसाळी वातावरण आणि त्यातच भरतीची वेळ यामुळे नदीच्या पाण्याची पातळी बरीच वाढलेली पण मस्तीमजा करायची म्हटले की त्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच . मडगावहून आपल्या मामाकडे आलेला दत्ता (नाईक), माझा नंतर मेहुणा बनलेला मोहन उर्फ गुरू ( पै ) आणि मी असे तिघेच त्या दिवशी नदीच्या पाण्यात करता येईल तेवढी मस्तीमजा करत पुन्हा ‘आलतडी ‘ येण्यासाठी ऊड्या घेतल्या तेव्हा पुढे येणा-या संकटाची पुसटशीही कल्पना कोणालाही नव्हती. आम्ही तिघानीही जवळपास तीर गाठला होता पण हातापायात आलेल्या गोळे आल्याने मला ईंचभरही पुढे सरकणे शक्य झाले नाही आणि व्हायचे तेच झाले. मी माझे मरण अनुभवत होतो. लखलखता सोनेरी स्वर्गलोकही मी प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवलाही. स्वर्गलोकातून पुन्हा मी मृत्युलोकात परतल्यानंतर अर्धवट शुद्धीवर आलो तेव्हा मला वाचवण्यासाठी सगळा गाव जमलेला मी पाहिला. नदीच्या काठावरील एका माडावर ‘सूर ‘ काढण्यासाठी चढत असलेल्या रेंदेर कुष्टाने मी पाण्यात बुडाल्याचे पाहून क्षणाचाही विलंब न करता पाण्यात ऊडी घेऊन माझा निश्चेष्ट देह वर काढला तेव्हा गावाच्या दृष्टीने जवळपास सगळेच संपले होते . पुरा गाव एव्हाना काठावर जमा झाला होता . रवींद्र तिंबलो तसेच अन्य काहीनी मला ऊलटे करून अखेरचे प्रयत्न केले आणि ज्याची अपेक्षाही कोणी केली नव्हती तो चमत्कार घडला. मृत्यूवर मी विजय मिळवला होता. नवरात्रकाळात स्वर्गात कोणाला प्रवेश दिला जात नाही असाही एक समज आहे कदाचित तो नियम मलाही लागू झाला असावा.
रविवार दुपारची बारा साडेबाराची वेळ असेल. माझे दोन्ही पाय पकडून ऊलटा करून दोघे तिघे मला आपल्यापरीने झोके देत होते तर एकटा माझे पोट दाबून पोटात गेलेले पाणी तोंडातून बाहेर कसे निघेल आणि मी पूर्ण शुद्धीवर कसा येईन यासाठी प्रयत्न करत होता. एव्हाना मी अर्धवट शुद्धीवर आलो होतो पण येथे नेमके काय चाललंय हे कळण्याच्या स्थितीत नव्हतो. किलकिल्या डोळ्यांनी भोवताली बघताना सारा गाव तेथे जमा झाला आहे आणि सगळी रडारड चालल्याचे अस्पष्टशे दृश्य मी पहात होतो. तोंडातून एका बाजूने पोटातील पाणी बाहेर निघताना होणा-या वेदना मला जाणवत होत्या पण जवळपास मृतावस्थेतून बाहेर पडताना सारे जग माझ्याभोवती फिरत असल्याचा भास मला होत होता तो आजही मी विसरू शकलेलो नाही . सुमारे दहा मिनिटे हे सर्व चालले असावे. एकदाचा मी नेमका कोठे आहे , काय चालले होते हे कळण्याएवढा मी शुद्धीवर आलो आणि सा-या गावाने रडत रडत का होईना टाकलेला दीर्घ निश्वास मला स्पष्ट जाणवला. मी पुन्हा या जगात परतलो होतो . ‘मृत्यु’ नंतरचा माझा तो जन्म होता . मनसोक्त रडून घेण्याव्यतिरिक्त मला आणखी काही करणे शक्य नव्हते. माझ्याभोवती जमलेल्या गर्दीत गावच्या सर्वच घरांतील लोक होते. नदीच्या पात्रात मी बुडाल्याचे पाहून माडावरून सरसर ऊतरत पाण्यातून मला बाहेर काढणारा कुष्टा, नंतर ज्यांचा मी साडू झालो ते रवींद्र तिंबलो,चंद्रकांत प्रभू, गोपालकृष्ण पै, . मामा- मामी, आत्या, कोणाकोणाची नावे घ्यावीत ? .आज पन्नास वर्षांनंतर यातील अनेकजण आमच्यामध्ये नसले तरी त्यांची आठवण आजही तेवढ्याच तीव्रतेने होते आणि मनाने मी आपसूकच त्याकाळात पोचतो.
माझा निश्चेष्ट देह पाण्यातून वर काढल्याचे ऐकल्यानंतर तेव्हाचे काणकोणातील प्रसिद्ध डाॅक्टर कमलाकर कुडचडकर यांनी तपासणीसाठी येण्यास चक्क नकार दिला आणि आपण आल्याने काही फरक पडणार नसल्याचा सल्लाही वरून दिला होता. त्याच सुमारास डाॅक्टरकीची परिक्षा पास होऊन आपली प्रॅक्टिस सुरू केलेले सदानंद प्रभू यांना घेऊन गुरू परतला. तोपर्यंत मी ब-यापैकी शुद्धीवर आलो होतो आणि धोका तर पूर्णपणे टळला होता. डॉ सदानंद प्रभू यांची झालेली ती पहिली ओळख आजही कायम टिकून आहे. यानंतर अर्थातच बाळाचा वाढदिवस या सदरात मामेभावाचा फोटो प्रसिद्ध झाला आणि मामीनेही सुटकेचा निश्वास सोडला. माझे काही बरेवाईट झाले असते तर सगळे खापर आपल्या माथ्यावर फोडले गेले असते हेच त्यानंतर नेहमीच मला ती सांगायची. नुकतीच दत्ता नाईकचीही मडगावला भेट झाली आणि अर्धशतकाआधींच्या या आठवणींना ऊजाळा मिळाला. गुरूची भेट तर नियमितपणे होतच असते. कुष्टा हा तर माझा दुसरा जन्मदाताच. सुवर्णमहोत्सवी सेकंड इनिंगच्या निमिताने त्याची भेट घेतली. क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचे झाल्यास तिसरे पंच ‘ देवाजी ‘ने २४ वर मी धडधडीत बाद असतानाही नाबाद ठरवल्यानेच आज मी नाबाद ५० ची सेकंड इनिंग बिनधास्त खेळत आहे. अखेरीस ‘आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना ‘ हेच सत्य आहे.