
कोंकणीतील बंडखोर स्त्री साहित्यावर २५ जुलैला राष्ट्रीय परिसंवाद
पणजी : साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्या पुढाकाराने कोंकणी भाषा मंडळ, गोवा आणि फादर आग्नेल कला व वाणिज्य महाविद्यालय, पिलार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोंकणी भाषेतील बायलांचे विद्रोही साहित्य’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद २५ जुलै रोजी पिलार येथील फादर आग्नेल महाविद्यालयाच्या हेरिटेज हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
परिसंवादाची सुरुवात सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभाने होईल. फा. आग्नेल महाविद्यालयाच्या कोंकणी विभागप्रमुख राजश्री सैल स्वागतपर भाषण करतील, तर कोंकणी भाषा मंडळाचे सचिव मंगळदास भट प्रास्ताविक करतील. महाविद्यालयाच्या प्राचार्या अॅनी राजन उद्घाटनपर भाषण करणार असून, कोंकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष सेराफिन कोता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विभागाच्या माजी प्रमुख प्रा. चंद्रलेखा डिसोझा या प्रमुख व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमीच्या कोंकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक मेल्विन रॉड्रिग्स भूषविणार असून, ओमप्रकाश नगर आभार प्रदर्शन करतील.
यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत पहिले तांत्रिक सत्र होईल. ग्वादालूप डायस यांच्या अध्यक्षतेखाली रजत हेगडे हे कोंकणी कवितेतील विद्रोही स्त्रीस्वरांचा उदय या विषयावर, तर पूजा सांगोडकर पितृसत्ताक मानसिकतेला आव्हान देणारी कोंकणी कथा या विषयावर संशोधनपर निबंध सादर करतील.
दुपारच्या भोजनानंतर दुपारी २ ते ३.३० या वेळेत दुसरे तांत्रिक सत्र होईल. अन्वेषा सिंगबाळ यांच्या अध्यक्षतेखाली अश्विन चारी कोंकणी वैचारिक साहित्यामधील स्त्रियांची अस्मिता आणि स्वातंत्र्य या विषयावर, तर फा. मिल्टन रॉड्रिग्स कोंकणी नाटक आणि तियात्रमधील स्त्रियांचा विद्रोह या विषयावर आपले विचार मांडतील.
स्त्रीवादी साहित्य, कोंकणी लेखनातील विद्रोही परंपरा आणि बदलत्या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या अभिव्यक्तीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, साहित्यप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.







