google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘पक्षांतर करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल’

पणजी :

एआयसीसीचे गोवा प्रमुख माणिकराव ठाकरे यांनी लोकसभा २०२४ निवडणुका आणि 2027 मधील विधानसभा निवडणुकीतही पक्ष जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

गोवा दौऱ्यावर असलेले माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर  पत्रकार परिषद घेवून राज्यात काँग्रेससाठी चांगली परिस्थिती असल्याचे सांगितले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रांसिस सार्दिन, आमदार कार्लूस फेरेरा आणि आमदार एल्टन डिकॉस्ता उपस्थित होते.

“मला विश्वास आहे की आम्ही आमची संघटना मजबूत करू. कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा असल्याने परिस्थिती चांगली आहे. 2024 ची लोकसभा आणि भविष्यात विधानसभा निवडणूकही आपण जिंकू, असे ठाकरे म्हणाले.

“मी पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही बैठका घेतल्या. मला वाटते की आमच्याकडे एक चांगला केडर आणि नेते आहेत. आम्ही उत्साहाने पुढे जाऊ आणि निवडणुका जिंकू, ” असे ते म्हणाले.

डबल इंजिन सरकार भ्रष्टाचारात गुंतले असून सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. “आम्ही या सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवू. योग्य आणि अयोग्य काय आहे हे त्यांना कळायला हवे. भाजप लोकशाही कशी संपवण्याचा प्रयत्न करत आहे हे लोकांना माहीत आहे,” असे ते म्हणाले.

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसला जिंकण्याचा विश्वास असल्याचे ठाकरे म्हणाले. “आमची स्थिती खूप चांगली आहे आणि आम्हाला दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास आहे. आगामी काळात आम्ही आमचे संघटन मजबूत करू,’’ असे ठाकरे म्हणाले.

पक्षांतराबद्दल बोलताना ते म्हणाले की, याचा अर्थ असा होता नाही की जेव्हा नेते पक्षांतर करतात तेव्हा निष्ठावंत समर्थककी दुसऱ्या पक्षात जातात.

“आम्ही लोकांशी बोललो आणि त्यांना माहित आहे की पक्षांतर लोकशाहीला कसे हानी पोहोचवत आहे. मला खात्री आहे की लोक पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवतील. जसे मागील विधानसभा निवडणुकीत झाले आहे तसेच पुढेही होईल,” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, लोकांचा काँग्रेसवर विश्वास आहे आणि ते चांगलेच जाणतात की जेव्हा नेते पक्षांतर करतात तेव्हा पक्षाचा दोष नसतो.
ते म्हणाले, “नेत्यांच्या पक्षांतरामुळे पक्षावर परिणाम होतो हे मला मान्य नाही.’’

‘‘भाजप धर्मावरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून राहुल गांधींनी ‘भारत जोडो यात्रा’ काढली. आता आम्ही मणिपूरमधून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी ‘न्याय यात्रा’ सुरू करणार आहोत.’’ असे ते पुढे म्हणाले.

माणिकराव ठाकरे यांनी पक्षाला तेलंगणात विजय मिळवून दिल्यानंतर नुकतीच गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, याआधी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून काम केले आहे आणि 8 वर्षे महाराष्ट्रात पक्षप्रमुख म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!