
चिराग नायक यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मडगाव: मडगावचे युवा उद्योजक आणि विचारवंत व साहित्यीक दत्ता नायक यांचे चिरंजीव चिराग नायक यांनी आज (गुरुवारी) रीतसर काँग्रेस प्रवेश केला. काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मागच्या ३५ वर्षांत मडगाव विकासापासून भरपूर दूर राहिले असे म्हणत हा ३५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे नायक यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसच्या गोवा सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेस केंद्रीय समितीचे सदस्य गिरीश चोडणकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव हे उपस्थित होते.
मडगावातील नामांकित व्यावसायिक आणि विचारवंत यांच्या उपस्थितीत चिराग नायक यांचा आजचा हा काँग्रेस प्रवेश होता. हा उपस्थितांचा मेळावा पाहून ठाकरे यांनी समाजात जर बदल करायचा असेल तर विचारवंतांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करताना, गोव्यातही आता राजकीय बदल घडवून आणण्यासाठी विचारवंतांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दीड वर्षापूर्वी दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर मडगावात काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला होता. यामुळे लोकसभा निवडणुकीत मडगावातून भाजपला मोठी आघाडी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होतो.
मात्र या निवडणुकीत कामत भाजपला फक्त दीड हजार मतांचीच आघाडी मिळवून देऊ शकले होते. आज नायक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मडगावातील काँग्रेसचे बळ आता वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागचे काही महिने चिराग नायक हे काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे सांगितले जात होते. मात्र काहींना काही कारणांमुळे हा प्रवेश लांबला होता. यामुळे काहीजण शंकाही व्यक्त करत होते. मात्र आज त्यांनी प्रवेश केल्यामुळे या शंकाकुशंकांना विराम मिळाला आहे.