google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

काँग्रेसला दोष देऊ नका, प्रकल्प रद्द करण्याचे धाडस करा आणि बेकायदेशीर कामे थांबवा : युरी

मडगाव :

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ज्या काँग्रेससोबत एकेकाळी सत्ता भोगली त्या काँग्रेसला दोष देणे थांबवावे आणि भाजपला कोळसा वाहतूक बंद करा, कॅसिनो आणि जुगार बंद करा, 3 रेषीय प्रकल्प रद्द करा, कळसा भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मान्यता मागे घ्या, बेरोजगारांना नोकऱ्या द्या,  आणि भ्रष्टाचार थांबवा असे भाजपला सांगण्याचे धाडस करावे असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव  यांनी हाणला आहे.


गोव्यात कोळसा आणण्यास काँग्रेसच  जबाबदार असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सांकवाळे येथे केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेत्यांनी वीजमंत्र्यांना अशी सर्व कामे थांबवण्याचे भाजपला सांगण्याचे धाडस दाखविण्याचे उघड आव्हान दिले.


मला सुदिन ढवळीकर यांना आठवण करून द्यायची आहे की आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी गोवा आणि गोमंतकीयांना हानिकारक ठरणाऱ्या कोळसा वाहतुकीसारख्या सर्व गोष्टी बंद करण्याचे भाजपला उघडपणे आव्हान दिले  होते. परत परत काँग्रेसला दोष देऊ नका, असा इशाराही त्यांनी भाजप आणि इतरांना दिला होता. दुर्दैवाने भाजप आणि मगो केवळ दोषारोपाचे खेळ करत आहेत, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

सुदिन ढवळीकर आता पक्षांतराची वकिली करताना पाहून धक्का बसला आहे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांना हे करणे भाग पडले आहे. कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यातील पक्षांतरविरोधी कायद्याने भाजपला बिथरला आहे आणि म्हणूनच त्यांनी सुदिन ढवळीकरांना यावर बोलण्यास पूढे केले, असे युरी आलेमाव म्हणाले.

काँग्रेस पक्षाने राज्यात नेहमीच लोकाभिमुख शासन दिले आहे. आम्ही गोव्याच्या लोकांच्या भावना ऐकल्या आणि काही वेळा आमचे स्वतःचे निर्णय बदलले. गोव्यातील लोकांसमोर झुकत काँग्रेसने सेझ आणि प्रादेशिक आराखडा रद्द केल्याचा दावा युरी आलेमाव यांनी केला.

गोव्यातील लोक सर्व काही पाहत आहेत आणि 7 मे 2024 रोजी भाजपला धडा शिकवतील. सुदिन ढवळीकर आणि इतरांचे मंत्रीमंडळातले दिवस आता भरले आहेत, असे युरी आलेमाव म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!