![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/09/images-1-4.jpeg)
‘संकल्प आमोणकरांचे आरोप निराधार’
पणजी:
मुरगावचे पक्षबदलू आमदार संकल्प आमोणकर यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अ.भा. काँग्रेसचे माजी सचिव आणि गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, आमोणकर यांनी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने भाजपने तयार केलेली स्क्रिप्ट प्रसारमाध्यमांसमोर वाचून दाखवली आहे. राहुल गांधींसह दिग्गज काँग्रेस नेत्यांवर दोषारोप करण्यामागे त्यांचा हाच हेतू आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान संकल्प यांची देहबोली वस्तुस्थिती सांगते. कारण ते जे बोलत होते त्याच्याशी त्यांचे शरीर सहकार्य करत नव्हते. मंत्रिपदासाठी संकल्पने आपला आत्मा भाजपकडे आत्मसमर्पण केला आहे, असे चोडणकर म्हणाले. जर संकल्प आमोणकर आपल्या आरोपांबाबत गंभीर असते तर त्यांनी माझ्यावरही आरोप केले असते. कारण मी अध्यक्ष होतो आणि 2022 ची गोवा विधानसभा निवडणूक पक्षाने माझ्या नेतृत्वाखाली लढवली होती.
विशेषत: आमोणकर यांनी केलेल्या विश्वासघाताबद्दल बोलताना माजी प्रदेशाध्यक्षांनी निदर्शनास आणून दिले की मुरगावच्या आमदारांना सर्व प्रकारच्या संभाव्य नेतृत्वाचे व्यासपीठ देण्यात आले होते. एनएसयुआय अध्यक्ष, युवक कॉंग्रेस अध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि विधानसभेतील उपनेते या प्रमुख पदांसाठी विचार केला गेला होता.
संकल्प आमोणकर विधानसभा निवाडणुकीत हे दोनदा पराभूत होऊनही, आम्ही त्यांना तिसऱ्यांदा बढती दिली आणि आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी वैयक्तिकरित्या घरोघर प्रचारात भाग घेऊन त्यांच्यासाठी प्रचार केला. राहुल गांधींनी संकल्प यांची 2007 मध्ये गोवा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. राहुल गांधींकडे दूरदृष्टी नाही हे लक्षात येण्यासाठी संकल्पला जवळपास 15 वर्षे लागली, तेही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ४८ तासांत, आसा टोला चोडणकर यांनी लगावला.
ते म्हणाले की, भाजप नेतृत्वाच्या घाणेरड्या युक्त्या आणि डावपेच, पक्षबदलू लोकांच्या सेवेचा वापर करून काँग्रेसच्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’स अपशकून करण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण राहुल गांधी एकाग्र आणि समर्पित नेते आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे पणतू आहेत व आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचे ते नातू आहेत.
पहिल्या 200 किमीच्या यात्रेत काँग्रेसला मिळालेल्या प्रतिसादाने भाजप हतबल झाला आहे, असे ते म्हणाले.
गिरीश चोडणकर म्हणाले की, संकल्प आमोणकर यांनी काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल जी आणि दिनेश गुंडू राव जी यांच्यावर केलेला आरोप पूर्णपणे निराधार आणि वास्तवापासून दूर आहे आणि त्याउलट वेणुगोपाल यांनी संकल्प ज्या निर्णयाचा उल्लेख करत आहेत त्यात कधीही हस्तक्षेप केला नाही.