पल्लवी धेंपे, दुरावस्था झालेल्या मडगावात शहरात स्वागत : मिशेल
मडगाव :
पल्लवी धेंपे, गोव्यातील जलदगतीने ढासळणाऱ्या मडगाव शहरात आपले स्वागत आहे! भाजप सरकारने गेल्या बारा वर्षात गोव्याची व्यापारी राजधानी मडगाव शहराची कशी वाट लावलीय ते आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पहाल अशी आशा आहे, असा टोला काँग्रेस नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे.
भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांनी सोमवारी 8 एप्रिल 2024 रोजी मडगावच्या न्यू मार्केट आणि इतर ठिकाणी भेट देवून विक्रेत्यांना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी मडगावला येणार असल्याच्या केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेस नेत्या मिशेल रिबेलो यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मडगाववासीयांना ग्रासणाऱ्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला आहे.
मला आशा आहे की पल्लवी धेंपे मडगावमधील न्यू मार्केटच्या प्रत्येक गल्लीबोळात फिरून एकंदर कोलमडलेल्या व्यवस्थेचा अनुभव घेतील. गजबजलेल्या बाजारपेठेत आग लागली तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणेच्या साधनांचा अभाव पल्लवी धेंपेनी बघावा. त्यांनी बाजारातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर देखील नजर टाकली पाहिजे तसेच मार्केट रोड आणि पिकअप स्टँड रोडला जोडणाऱ्या गल्ल्यांमध्ये कचऱ्याचे ढिगही बघावेत असा सल्ला मिशेल रिबेलो यांनी पल्लवी धेंपेना दिला आहे.
भाजप दक्षिण गोव्याच्या उमेदवाराने मडगाव न्यू मार्केटच्या परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंग पहावे. जुन्या स्टेशन रोडवरून चालताना तिला गोव्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांने प्रतिनिधीत्व केलेले शहर कसे उद्ध्वस्त होऊ शकते याची खरी जाणीव होईल, असे मिशेल रिबेलो यांनी म्हटले आहे.
पल्लवी धेंपेना कोकण रेल्वे स्थानकाच्या उत्तरेच्या बाजूला फेरी मारताना आकेंतील तिचे बालपणीचे दिवस आठवतील. आता तेथे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कशी कोलमडली आहे याचा अनुभव पल्लवी धेंपेनी घ्यावा . व्हिक्टर हॉस्पिटल ते कोकण रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील भागात फिरताना रस्त्यावरील बेकायदा दुकानांचे गॉडफादर असलेले पक्षांतर बहाद्दर आमदार दिगंबर कामतांकडून पल्लवी धेंपेनी व्होट बँक कशी वाढवायची याचे मार्गदर्शन घ्यावे, असा सल्ला मिशेल रिबेलो यांनी दिला आहे.
ईएसआय हॉस्पिटलपासून काही मीटर अंतरावर मडगाव-केपें रस्त्यावरील आझाद नगरी बाहेरील रस्ता पल्लवी धेंपेनी बघणे विशेष महत्वाचे आहे. मला आशा आहे त्या फकीर बांध आणि मोती डोंगरला देखील भेट देतील आणि तिथल्या लोकांची हलाखीची परिस्थिती समजून घेतील. मडगावच्या बाबांच्या आशिर्वादाने कार्यरत असलेल्या माफियांच्या सतत धमक्याखाली लोक कसे जगतात हे पल्लवी धेंपेनी पाहावे असे मिशेल रिबेलो यांनी म्हटले आहे.
गोवा राज्याला जास्तीत जास्त महसूल देत असताना मडगाव शहराची स्थिती अशी दयनीय का झाली हे पल्लवी धेंपेनी मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारायला हवे असे मिशेल रिबेलो यांनी शेवटी म्हटले आहे.