‘या’ महत्वाच्या ठिकाणाहून ‘इंडिया आघाडी’ करणार प्रचारास सुरूवात
पणजी :
काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेले इंडियाचे दोन उमेदवार ॲड. रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस मंगळवार 9 एप्रिल 2024 रोजी हुतात्मा स्मारक, पत्रादेवी येथून सकाळी 9 वाजता आणि लोहिया मैदान, मडगाव येथून सकाळी 11.30 वाजता प्रताराचा प्रारंभ करणार आहेत. त्याच दिवशी “गुढीपाडवा” असल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. प्रचाराच्या प्रारंभाने “गोवा वाचवा” चळवळ सुरू होणार आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
आज लोकशाही धोक्यात आहे. भाजपने सुरू केलेल्या पक्षांतरांमुळे आपल्या संविधानावर हल्ला होत आहे. आमची जमीन क्रोनी व भांडवलदारांनी ताब्यात घेतली आहे . गोव्याची ओळख जपण्याची वेळ आली आहे. भाजपची हुकूमशाही राजवट संपवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊ या, असे आवाहन अमित पाटकर यांनी केले आहे.
आम्हाला गोमंतकीयांकडून मिळत असलेल्या भावनिक पाठिंब्याने आम्ही भारावून गेलो आहोत. आमच्या सर्व नेत्यांना शेकडो फोन येत असून भाजपला सत्तेतून दूर करण्याच्या आमच्या ध्येयाशी लोक पाठिंबा दर्शवतात हे खरेच काळजाला भिडणारे आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
गोमंतकीयांनी हुतात्मा स्मारक, पत्रादेवी आणि लोहिया मैदान, मडगाव येथे मोठ्या संख्येने जमा व्हावे आणि इंडियाच्या उमेदवारांना आपला बहुमोल पाठिंबा द्यावा अशी मी समस्त गोमंतकीयांना नम्र विनंती करतो. आम्ही तुम्हाला वचन देतो की आमचे दोन्ही उमेदवार संसदेत “गोव्याचा आवाज” बनून काम करती, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
…