
‘नवीन शॅक धोरणातील वयाची अट शिथिल’
गोवा सरकारने या वर्षी नवीन शॅक धोरण जाहीर केले होते. पण त्यातील वयाच्या अटीवरून पारंपरिक शॅक चालकांमध्ये नाराजीचा सूर होता. नवीन शॅक धोरणात परवाना पात्रतेसाठी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना अपात्र ठरवणारी अट त्यात होती.
वयोमर्यादेची ही जाचक अट रद्द करावी, मागणी व्यावसायिकांसह राजकीय क्षेत्रांतूनही होऊ लागली होती. त्यावर आज, गुरूवारी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नवीन शॅक धोरणातील वयोमर्यादेची अट शिथिल केल्याचे घोषित केले.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, राज्य सरकारने नवीन शॅक धोरणातील वयोमर्यादेचे निकष शिथिल केले आहेत. आणि ते सर्व वयोगटांसाठी खुले ठेवले आहेत. पूर्वी फक्त 18 ते 60 असा वयोगट निश्चित्त केला होता.
तथापि, पारंपरिक शॅक व्यवसाय करणारे चालक-मालक 65 ते 70 वर्षांचे असल्यास ते देखील अर्ज करू शकतील.
किंवा त्यांच्या पुढच्या पीढीला व्यवसाय करण्यास परवानगी देऊ शकतत. त्याचा अनुभव त्याच्या वडिलांसोबत मोजला जाईल. तथापि, शॅक्समध्ये गोव्याचे जेवण मिळाले पाहिजे, ते अनिवार्य असेल, असेही खंवटे यांनी स्पष्ट केले.
शॅकमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली होती. त्यानंतर सरदेसाई यांनीही नव्या धोरणामुळे शॅक मालकांवर अन्याय होत असल्याचे सांगत वयाची अट मागे घ्यावी, असे म्हटले होते.
खुद्द शॅक मालकांच्या वेल्फेयर सोसायटीने देखील मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन देत सहा मागण्या केल्या होत्या.
त्यातील प्रमुख मागणी वयाची अट रद्द करण्याचीच होती. वयाची अट घातल्याने ज्यांची पुढची पिढी या व्यवसायात नाही, त्यांना हा शॅक व्यवसाय करण्याची संधी मिळणार नाही, असे अनेक पारंपरिक व्यावसायिकांचे मत होते.
शिवाय साठ वर्षांवरील ज्या व्यक्तीला हा व्यवसाय करायची इच्छा आहे, त्याच्यावर यामुळे अन्याय होत असल्याचे म्हणणे अनेकांनी व्यक्त केले होते.