प्रसिध्द कोंकणी साहित्यिका आणि अनुवादिका सुनेत्रा जोग यांना साहित्य अकादेमीचा अनुवाद पुरस्कार आज जाहीर झाला. मालती राव यांच्या ‘डिसऑर्डरली वुमेन’ या पुस्तकाचा त्यांनी ‘अस्ताव्यस्त बायलो’ नावाने केलेल्या कोंकणी अनुवादाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर मराठीमध्ये ‘ब्राह्मोस : एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा’ या अनुवादित पुस्तकासाठी अभय सदावर्ते यांना पुरस्कार जाहीर झाला. 50 हजार रोख, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सुनेत्रा जोग या कोंकणी भाषेतील महत्वाच्या अनुवादिका म्हणून प्रसिध्द आहेत. हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील कित्येक गाजलेल्या पुस्तकांचे त्यांनी ओघवते कोंकणी अनुवाद करत कोंकणी साहित्य समृध्द करण्यात हातभार लावला आहे. ‘अस्ताव्यस्त बायलो’ हे त्यांचे पुस्तक 2018 साली प्रकाशित झाले असून, या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. साहित्य अकादेमीच्या यावर्षीच्या अनुवादित पुस्तकांच्या पुरस्कारांच्या अंतिम यादीत या विजेत्या पुस्तकासोबतच ‘तीन हजार टाकें’ या सुधा मुर्तींच्या अनुवादित पुस्तकाचाही समावेश होता हे विशेष.
साहित्य अकादेमीच्यावतीने आज 24 भाषांतील अनुवादित पुस्तकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. 2017 ते 2021 या कालखंडातील पुस्तकांचा या पुरस्कारांसाठी विचार करण्यात आला होता. कोंकणी भाषेतील पुस्तकाची निवड जयश्री शानबाग, प्रशांती तळपणकर, रामनाथ गावडे यांच्या परिक्षक मंडळाने केली. तर मराठी भाषेतील पुस्तकाची निवड चंद्रकांत भोंजाळ, माया पंडित नारकर, शारदा साठे या परिक्षक मंडळाने केली.
…