google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘केंद्रातील नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य देऊ…’

पणजी :

आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष सत्तेवर आल्यास केंद्र सरकारमधील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देऊ आणि बेरोजगार महिलांनाही याचा लाभ मिळवून देऊ असे आश्वासन गोवा प्रदेश महिला काँग्रेसबे सोमवारी दिले.


महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी सोमवारी काँग्रेस हावसमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, केंद्र सरकारमधील रिक्त पदे भरण्यात भाजप अपयशी ठरला आहे.


सालिगाव गट अध्यक्ष ईशिका मांद्रेकर आणि डिचोली गट अध्यक्ष मारिया जॉनिता सौझा उपस्थित होत्या.

“आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर केंद्र सरकारमध्ये 30 लाख कायमस्वरूपी नोकऱ्या भरण्याचे वचन देतो. भाजप सरकार ही पदे भरण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे देशातील बेरोजगार तरुणांना वंचित ठेवले गेले,” असे नाईक म्हणाल्या.


त्या म्हणाल्या की गोव्यातही अनेक तरुण बेरोजगार आहेत आणि भाजपने प्रत्येक निवडणुकीत रोजगार देण्याचे आश्वासन देऊनही हा प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे.

” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असो, विधानसभा असो किंवा लोकसभा, भाजप नेत्यांनी मोठ्या संख्येने नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते. त्यांनी या सर्व निवडणुकांमध्ये किमान ५० हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आणि निवडून आल्यावर नोकऱ्या देण्यात त्यांना अपयश आले. मोफत एलपीजी सिलिंडर देण्यास त्यांची गॅरंटी जशी अयशस्वी झाली, तशीच नोकऱ्या बाबतही झाली आहे,” असे नाईक म्हणाल्या.



त्या  म्हणाल्या की, भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदिवासीबहुल राजस्थानमधील बांसवाडा भागात पोहोचल्यानंतर तरुणांना 30 लाख कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

“सरकारच्या विविध खात्यांमधील रिक्त पदे भरून आमच्या बेरोजगार तरुणांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे, ज्यात भाजप अपयशी ठरला आहे. केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये 10 लाख मंजूर पदे रिक्त आहेत,” असे बीना नाईक म्हणाल्या.



त्या म्हणाल्या की, काँग्रेस सत्तेत आल्यावर त्यांचा पक्ष रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देईल, खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीसोबत एक वर्षाची ॲप्रेन्टीशीप सुरू करेल, ’पेपर लीक’ रोखेल, स्टार्ट-अपसाठी रु 5,000 कोटी निधी आणि ’गीग’ कामगारांच्या कल्याणासाठी काम करणार.

बीना नाईक म्हणाल्या, 25 वर्षांखालील प्रत्येक डिप्लोमाधारक किंवा महाविद्यालयीन पदवीधरांना खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत एक वर्षाची ॲप्रेन्टीशीप देण्यासाठी काँग्रेस नवीन ॲप्रेन्टीशीप अधिकार कायद्याची हमी देते. “आम्ही हे सुनिश्चित करू की त्यांना वर्षाला 1 लाख रुपये मिळतील. यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीला प्लेसमेंट मिळेल,” असे त्या  म्हणाल्या.


नाईक म्हणाल्या की त्यांचा पक्ष परीक्षा आयोजित करताना प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेचे सर्वोच्च मानक सुनिश्चित करण्यासाठी नवीन कायदे आणेल ज्यामुळे पेपर फुटीला प्रतिबंध होईल व कोट्यवधी तरुणांचे भविष्य नष्ट होण्यापासून वाचेल.

“पाच वर्षांच्या कालावधीसाठी रु 5,000 कोटी कॉर्पस तयार करू, ज्याचे वाटप देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार. 40 वर्षांखालील तरुण कोणत्याही क्षेत्रातील त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांसाठी स्टार्ट-अप निधी मिळवू शकणार,’’ असे त्या म्हणाल्या.



“गिग इकॉनॉमीमध्ये दरवर्षी रोजगार शोधणाऱ्या लाखो तरुणांसाठी चांगली कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेस कायदा आणण्याची हमी देतो,” असे त्या  म्हणाल्या. 


रोजगार निर्मितीचे आश्वासन पाळण्यात भाजप अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. “प्रत्येक निवडणुकीत भाजप नेते नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात. मात्र  दिलेली आश्वासने पाळण्यात अपयश आले आहे. त्यांची आश्वासने आता देशातील लोक ‘जुमला’ मानत आहेत,” असे त्या म्हणाल्या.

..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!