
गोवा काँग्रेसकडून तीन संयोजकांची नियुक्ती
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीने (जीपीसीसी) पक्षाची संघटनात्मक रचना अधिक सक्षम करण्यासाठी आणि विविध सामाजिक घटकांशी संवाद वाढविण्याच्या उद्देशाने तीन नव्या संयोजकांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली असून, सोकोरो सेबी मेनेझिस यांची सिव्हिल अँड सोशल आऊटरीच काँग्रेसचे संयोजक, ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते उदय आनंद चारी यांची आरटीआय सेल काँग्रेसचे संयोजक, तर संजय बार्दे यांची गोवा किसान काँग्रेसचे संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त संयोजकांचे अभिनंदन करताना गिरीश चोडणकर यांनी संघटन अधिक बळकट करण्यासाठी तसेच समाजातील विविध घटकांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी ते समर्पितपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.
पारदर्शकता, सामाजिक कल्याण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच संघटनात्मक कामकाजाला गती देण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने नवनियुक्त तिन्ही संयोजकांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारेचा आणि विविध कार्यक्रमांचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या योगदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे.







