
नीट पेपरफुटीनंतर एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी
नवी दिल्ली : नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)मध्ये मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, ४७ अधिकाऱ्यांची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने एनटीएच्या कार्यपद्धतीत व्यापक बदल करण्यास सुरुवात केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई केवळ कर्मचाऱ्यांच्या बदलापुरती मर्यादित नसून एनटीएच्या संपूर्ण रचनेत सुधारणा करण्याच्या व्यापक योजनेचा भाग आहे. संबंधित काही अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची तसेच फौजदारी कारवाईही केली जाऊ शकते.
केंद्र सरकार परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आउटसोर्सिंग व्यवस्था बदलण्याच्या तयारीत असून, प्रश्नपत्रिका सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा आणि प्रशासकीय देखरेख अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी ‘लीक-प्रूफ’ परीक्षा प्रणाली विकसित करण्याचाही सरकारचा मानस आहे. या सुधारणांचा आधार तज्ज्ञ समितीच्या शिफारशी असणार असल्याचे सांगितले जात आहे.
नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणानंतर एनटीएवर देशभरातून टीका झाली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) असून, अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने ही व्यापक सुधारणा प्रक्रिया सुरू केल्याचे मानले जात आहे.







