देश/जग

‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण; राष्ट्रगीतासोबत गायन बंधनकारक

नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणे कायदेशीर संरक्षण देणाऱ्या Prevention of Insults to National Honour (Amendment) Bill, 2026 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’च्या गायनात जाणूनबुजून अडथळा आणणे किंवा गायन करणाऱ्या समूहाला अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा ठरणार आहे.


केंद्र सरकारने यापूर्वीच अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण सहा कडव्यांची आवृत्ती सादर करण्याबाबत नियम निश्चित केले आहेत. या आवृत्तीचा कालावधी सुमारे ३ मिनिटे १० सेकंद आहे. राष्ट्रगीत ‘जन गण मन’ सादर करण्यासाठी सुमारे ५२ सेकंद लागतात.


दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या नव्या नियमाच्या व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ या दोन्हींचा आपण मनापासून आदर करतो, असे सांगतानाच अधिकृत कार्यक्रमांमध्ये पूर्ण ‘वंदे मातरम्’ अनिवार्य करण्यामुळे कार्यक्रमाचा कालावधी वाढणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.


‘आदर आणि संयम कायद्याने निर्माण करता येतो का?’


थरूर यांनी म्हटले की, ‘जन गण मन’साठी प्रेक्षकांना सुमारे ५२ सेकंद उभे राहावे लागते, तर संपूर्ण ‘वंदे मातरम्’साठी तीन मिनिटांहून अधिक वेळ लागतो. तामिळनाडूतील राज्यगीताचाही समावेश केला तर हा कालावधी आणखी वाढतो. त्यामुळे प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी नागरिकांना दीर्घकाळ उभे राहण्याची अपेक्षा करणे कितपत व्यवहार्य आहे, असा सवाल त्यांनी केला.



“आदर आणि संयम कायद्याने निर्माण करता येतो का?” असा प्रश्न उपस्थित करत थरूर यांनी या निर्णयाचा उद्देश ‘वंदे मातरम्’बद्दल अधिक आदर निर्माण करणे असला, तरी त्याचा परिणाम उलट होण्याची शक्यता असल्याचे म्हटले.


दरम्यान, ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रथमच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘वंदे मातरम्’ सादर केले जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!