गोवा

प्रदेश काँग्रेसच्या बैठकांना सुरुवात…

मडगाव : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मडगाव येथील ग्रेस मॅजेस्टिक हॉटेलमध्ये सोमवारी सर्व ४० मतदारसंघांच्या प्रतिनिधींची व्यापक रणनीती व संघटन बळकटीकरण बैठक झाली.


अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष एम. के. शेख, कार्लुस अल्वारीस फेरेरा, अल्टोन डी’कोस्टा आणि सुनील कवठणकर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.


राज्यातील सर्व ४० मतदारसंघांचे ब्लॉक अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सहभाग घेतला. प्रत्येक मतदारसंघातील संघटनात्मक स्थिती, स्थानिक पातळीवरील अडचणी, जनतेशी असलेला संपर्क तसेच आगामी काळातील पक्षाच्या कार्यक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली.


बूथ पातळीवर संघटना मजबूत करण्यावर भर

काँग्रेसची बूथ पातळीवरील संघटना अधिक सक्षम करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. स्थानिक प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविण्याबाबतही चर्चा झाली.


पक्षात एकजूट, शिस्त आणि सामूहिक जबाबदारी यांची गरज असल्याचे काँग्रेस नेतृत्वाने यावेळी स्पष्ट केले. आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाताना राज्यातील जनतेशी संबंधित प्रश्न आक्रमकपणे मांडण्याबरोबरच जनतेशी सातत्यपूर्ण संवाद ठेवण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.


या बैठकीस जिल्हाध्यक्ष आसिस नॉरोन्हा, राजेश वेरेकर, शशांक नार्वेकर, मंगलदास नाईक, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिक्षा खलप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आर्चित नाईक, सेवादलचे मुख्य संघटक राजन घाटे तसेच प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


सर्व ४० मतदारसंघांतून नेते आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा झालेला सहभाग पक्ष संघटनेत नव्या ऊर्जेचे संकेत देणारा असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


बैठकीचे सूत्रसंचालन एम. के. शेख यांनी केले, तर अमरनाथ पणजीकर यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!