
केजरीवालांनी घेतले विजय सरदेसाई यांच्या घरी गणपतीचे दर्शन
पणजी : आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गणेश चतुर्थीनिमित्त गोव्यात विविध ठिकाणी गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनी बोरी येथील ‘आप’च्या एका कार्यकर्त्याच्या घरी तसेच फोंडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गीतेंश नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या वडिलोपार्जित घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
विजय सरदेसाई यांच्या निवासस्थानी दर्शन घेतल्यानंतर केजरीवाल यांनी ‘गोवा फर्स्ट’ आघाडीच्या पहिल्या व्हिडीओ मोहिमेचा संदर्भ देत काँग्रेस आणि भाजपवर टीका केली. गोव्यातील मतदार पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना कंटाळले असून, आगामी निवडणुकीत मतदार वेगळा पर्याय शोधत आहेत, असा दावा त्यांनी केला.
“भाजप आणि काँग्रेसच्या ‘पॉकेट्स फर्स्ट’ अर्थात स्वतःच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणामुळे बिल्डर माफियाला बळ मिळाले आणि गोव्याचे नुकसान झाले,” असा आरोप केजरीवाल यांनी केला. आगामी काळात गोव्यात ‘पॉकेट्स फर्स्ट’ नव्हे, तर ‘गोवा फर्स्ट’चे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
AAP आणि GFP यांनी 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच ‘गोवा फर्स्ट’ या नावाने आघाडी जाहीर केली आहे. ही आघाडी भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून उभी करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.
गोव्यातील जनतेला प्रत्यक्षात काय हवे आहे, यावर दोन्ही पक्ष मिळून पुढील काळात आराखडा तयार करतील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत विचारले असता, त्यावर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे केजरीवाल आणि सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
‘गोवा फर्स्ट’ आघाडीला इतर समविचारी राजकीय शक्तींसाठीही दरवाजे खुले असल्याचे सरदेसाई यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात या आघाडीत आणखी कोणते पक्ष किंवा नेते सहभागी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







