
आप गोवाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
पणजी : आगामी 2027 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (AAP) संघटन विस्ताराला गती देत राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. पक्षाच्या राज्य संघटनेला बळकटी देण्यासाठी विविध विभाग, महिला, युवक आणि अनुसूचित जमाती (ST) आघाड्यांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या नियुक्त्यांमुळे तळागाळातील संघटन अधिक मजबूत होईल, स्थानिक नेतृत्वाला संधी मिळेल आणि मतदारसंघ स्तरावर जनसंपर्क वाढविण्यास मदत होईल. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करून भाजपला सक्षम पर्याय म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे नेत्यांनी सांगितले.
नव्या नियुक्त्यांमध्ये मॅन्युएल सिमाओ कार्डोझो आणि अमित जोग यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. जेनिफा डायस यांची AAP लीगल सेलच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
युवक आघाडीत दुर्वा पेडणेकर यांच्याकडे उत्तर गोवा युवा अध्यक्षपदाची, तर तेजस्विनी गावकर यांच्याकडे कुशावती युवा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महिला आघाडीत संजावी वेलीप यांची कुशावती महिला अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून रतिश्मा शिरोडकर यांची उत्तर गोवा महिला उपाध्यक्ष आणि सरिता पांजिकार यांची दक्षिण गोवा महिला उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
तसेच मिनू गावडे यांची दक्षिण गोवा ST विंग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनात्मक पातळीवर गीतिश नाईक यांच्याकडे फोंडा विधानसभा अध्यक्षपदाची तर संताना डायस यांच्याकडे फोंडा संघटन सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्त्यांना राज्य प्रभारी अतिशी आणि गोवा अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी मान्यता दिली आहे.
पक्षाच्या मते, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यातील संघटन विस्तार, जनसंपर्क मोहीम आणि निवडणूकपूर्व तयारी अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. आगामी 2027 विधानसभा निवडणुकीत मजबूत पर्याय म्हणून उभे राहण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे AAP ने स्पष्ट केले आहे.





