
लोर्ना यांचा गोमंत विभूषण आणि पद्म पुरस्काराने सन्मान करा : प्रभव नायक
मडगाव: “गोव्याच्या ‘नाईटिंगेल’ लोर्ना कॉर्देरो यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना, या महान गायिकेला गोमंत विभूषण प्रदान करावे तसेच पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी मी सरकारकडे पुन्हा एकदा करीत आहे,” असे मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
नायक यांनी आठवण करून दिली की, ९ ऑगस्ट २०२५ रोजी महान गायिका लोर्ना यांच्या वाढदिवसानिमित्त मडगांवचो आवाजच्या वतीने गोवा सरकारकडे त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला गोमंत विभूषण प्रदान करावा आणि पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी, अशी औपचारिक मागणी करण्यात आली होती. कोकणी संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची तसेच गोव्याची सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचविण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेऊन ही मागणी करण्यात आली होती.
२५ जानेवारी २०२६ रोजी पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाल्यानंतरही लोर्ना यांचे नाव यादीत नसल्याबद्दल आपण पुन्हा एकदा निराशा व्यक्त केली होती, असे नायक यांनी सांगितले. यापूर्वी वारंवार मागणी करूनही आणि लोर्ना यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना योग्य सन्मान मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे त्यांनी म्हटले.
“ लोर्ना या केवळ गायिका नाहीत; त्या एक संस्था आहेत. आपल्या आवाजातून त्यांनी गोव्याचा आत्मा जगभर पोहोचवला. त्यांच्या गीतांनी कोकणी संगीताला ओळख, प्रतिष्ठा आणि जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. अशा महान सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचा राज्य आणि राष्ट्राच्या सर्वोच्च सन्मानांनी योग्य वेळी गौरव झाला पाहिजे. आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या व्यक्तींना सन्मान देण्याचे कर्तव्य गोव्याने विसरता कामा नये,” असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
प्रभव नायक यांनी सरकारला लोर्ना कॉर्देरो यांना तातडीने गोमंत विभूषण प्रदान करावे आणि पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, असे पुन्हा एकदा आवाहन केले. ही मागणी वारंवार करण्यात आली असून आता ती प्रलंबित ठेवू नये, असे त्यांनी सांगितले. “त्यांच्या वाढदिवशी मी सरकारला आवाहन करतो की, गोव्याच्या नाईटिंगेलला न्याय द्या. लोर्ना यांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नव्हे; तो गोव्याची भाषा, संगीत, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान आहे,” असे प्रभव नायक यांनी ठामपणे सांगितले.







