महाराष्ट्र

आर्थिक साक्षरता ही काळाची गरज : अस्लम जमादार

पुणे : केवळ पैसा असणे म्हणजे श्रीमंती नव्हे, तर त्याची योग्य गुंतवणूक करून दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करणे आणि त्यानुसार आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लेखक व ज्येष्ठ आर्थिक गुंतवणूक सल्लागार अस्लम जमादार यांनी केले.


‘पॉलिसी मनी’ संस्थेतर्फे आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या परिसंवादाला एलआयसी, ॲक्सिस मॅक्स, मिराए ॲसेट, एचडीएफसी, एसबीआय, नुवा भूपा, श्रीराम फायनान्स, टाटा जनरल, मॅनिपाल सिग्मा, आदित्य बिर्ला, बजाज लाइफ आदी विमा व वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


जमादार म्हणाले, ‘‘आर्थिक नियोजन आणि विम्याबाबत अद्यापही अनेक जण उदासीन आहेत. अवघ्या ३०० ते ४०० रुपयांत पाच लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा उपलब्ध असतानाही त्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. जन्मापासूनच मुलांच्या भविष्यासाठी केलेली छोटी गुंतवणूकही पुढे शिक्षण आणि इतर गरजांसाठी मोठी मदत ठरू शकते.’’


भारतात आर्थिक साक्षरतेचे प्रमाण सुमारे २५ टक्के असून, बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावी, यासाठी ‘पॉलिसी मनी’ काम करत असल्याचे संस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी बाबुराव व्हनकोल यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्नेहा बतुळकर यांनी केले. स्वागत व आभार संजय आंबेसंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नामदेव भेलोंढे, दिनेश यादव, गणेश जंगम आणि गजानन देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!