महाराष्ट्र

NEET आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधूंचा ‘तिरंगा मार्च’

मुंबई : NEET परीक्षेतील कथित गोंधळ, विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आणि आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नांच्या निषेधार्थ २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा मार्च’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना केले आहे.


राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून जारी केलेल्या पत्रात या मोर्च्याचे स्वरूप पूर्णपणे अराजकीय असल्याचे स्पष्ट केले आहे. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा किंवा पक्षनेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जाणार नसून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधातील निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


मोर्च्याचे निमंत्रक आपण आणि उद्धव ठाकरे असलो तरी आपल्या किंवा उद्धव ठाकरे यांच्या नावानेही घोषणा देऊ नयेत, असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा असल्याचे भान सर्वांनी ठेवावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.


मोर्चादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन करताना, गोंधळ घालण्याचा किंवा महिलांना, मुलींना अथवा पालकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.


याशिवाय, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी करून घ्यावे, त्यांची काळजी घ्यावी आणि ते सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.


हा ‘तिरंगा मार्च’ २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून सुरू होणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!