अखेर ठरले; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी…
मुंबई:
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन केलंय.
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठरला. तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.
महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, त्यावर पहिल्या रांगेत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था असेल. तर मागे एका बाजूला मंत्री, तर दुसऱ्या बाजूला काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर समोर सुमारे २५ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार असून, तेथे १० हजार महिलांची व्यवस्था केली जाणार आहे.
२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला निर्वावद बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं होतं. परंतु, मुख्यमंत्री पदावरून अडलं होतं. एकनाथ शिंदेंही मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याची चर्चा होती. त्यामुळे हा तिढा कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दुसरीकडे भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची घोषणा करणेच बाकी होते.प दरम्यान, आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचत विधिमंडळ नेता निवडीची औपचारिकता पार पाडली. बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून आले होते.
देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार :
“एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.