ज्येष्ठ विचारवंत डॉ. हरी नरके यांचे निधन
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे विचारवंत, लेखक, वक्ते हरी नरके यांचं मुंबईत निधन झालं. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांची प्रकृती बिघडली. मुंबईतल्या एशियन हार्ट इन्स्टिट्युट या ठिकाणी त्यांचं निधन झालं.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले.
हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.