देश/जगमहाराष्ट्र

“चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेने का सहन करायचा?”; राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना खुलं पत्र

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी नागरिकांना काटकसर करण्याचं केलेलं आवाहन आणि देशातील आर्थिक परिस्थिती यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेने का सहन करायचा?” असा सवाल करत त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून विस्तृत खुलं पत्र लिहिलं आहे.


इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं, अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचं, विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवण्याचं आणि काटकसर करण्याचं आवाहन केल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


“सोनं, पेट्रोल-डिझेल आयात करण्यासाठी विदेशी चलन खर्च होतं हे खरं आहे. पण त्याचवेळी पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शेकडो गाड्यांचे ताफे, रोड शो आणि प्रचारसभा सुरूच असतात. मग काटकसर फक्त जनतेनेच का करायची?” असा सवाल त्यांनी पत्रात केला आहे.


राज ठाकरे यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर ९० ते १०० डॉलर प्रति बॅरल जाण्याची ही पहिली वेळ नाही. “२००८, २०११-१२, २०१३-१४ आणि २०२२-२३ या काळातही तेलाचे दर याच पातळीवर गेले होते. त्या वेळी ना Manmohan Singh यांनी अशा प्रकारचं आवाहन केलं, ना नरेंद्र मोदींनी,” असं त्यांनी नमूद केलं.


त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही देशात पेट्रोल-डिझेल महागच विकण्यात आलं, असा आरोप करत “त्या काळात नागरिकांकडून जमा झालेले लाखो कोटी रुपये कुठे गेले?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


‘रेवडी संस्कृती’वरूनही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “ज्या रेवड्यांवर पंतप्रधान टीका करतात, त्याच रेवड्या वाटून निवडणुका जिंकल्या जात आहेत,” असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख केला. अशा योजनांमुळे राज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या खर्चावरही टीका केली. “देशभरातून लाखो लोकांना सभा आणि रोड शोसाठी आणलं जातं, त्यावेळी कोट्यवधी लिटर पेट्रोल-डिझेल खर्च होतं. तेव्हा काटकसर का आठवत नाही?” असा प्रश्न त्यांनी विचारला.


विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी देशातील शिक्षणव्यवस्थेवरही टीका केली. “गेल्या दहा वर्षांत शिक्षण क्षेत्रात मूलभूत गुंतवणूक झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची इच्छा होते,” असं ते म्हणाले.

परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत असल्याचाही उल्लेख त्यांनी पत्रात केला. “मोठमोठे करार जाहीर होतात; पण प्रत्यक्ष गुंतवणूक किती होते?” असा सवाल करत त्यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवरही टीका केली.


माजी पंतप्रधान Lal Bahadur Shastri यांचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले, “शास्त्रीजींनी युद्धकाळात काटकसरीचं आवाहन केलं होतं; पण ते स्वतःही त्याप्रमाणे वागले. आजचे नेते तसं करतील का?”

पत्राच्या शेवटी त्यांनी केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेची खरी स्थिती जनतेसमोर मांडण्याचं आवाहन केलं. “रुपयाचं अवमूल्यन का झालं, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर्सनी राजीनामे का दिले, हे देशाला सांगा,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, विशेष संसदीय अधिवेशन बोलावून आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.



“विरोधक प्रश्न विचारतात म्हणजे ते देशाचे शत्रू होत नाहीत,” असं सांगत “काटकसरीची सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करा,” असा सल्लाही राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!