गोवा

केजरीवालांचा ‘भाजप हटाओ, गाडी बचाओ’ नारा

पणजी : E20 पेट्रोलच्या सक्तीच्या वापराविरोधात आम आदमी पक्षाने (आप) गोव्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांना ‘भाजप हटाओ, गाडी बचाओ’ असा नारा देत भाजपला सत्तेतून हटवण्याचे आवाहन केले.


पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, गोवा ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार क्रुझ सिल्वा, आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास आणि वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर-देसाई उपस्थित होते.


E20 धोरणाचा गोव्यातील वाहनधारकांना मोठा फटका बसणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. गोव्यात मोठ्या प्रमाणात कार आणि दुचाकी वापरल्या जात असल्याने राज्यातील ८५ ते ९० टक्के कुटुंबांवर या धोरणाचा परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.


अमेरिकन इथेनॉलसाठी बाजारपेठ निर्माण केल्याचा आरोप

मोदी सरकार पुरेशी तयारी न करता E20 पेट्रोल देशावर लादत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. अमेरिकेतून इथेनॉल आयात करण्यासाठी भारतात बाजारपेठ निर्माण केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या वर्षी भारताने अमेरिकेतून सुमारे एक अब्ज लिटर इथेनॉल आयात केले असून यंदा ही आयात पाच अब्ज लिटरपर्यंत वाढू शकते, असे ते म्हणाले.


२०२३ पूर्वी उत्पादित झालेली सुमारे ३० कोटी वाहने E10 इंधनासाठी तयार करण्यात आली असून ती E20 साठी सुसंगत नसल्याचा दावा करत, अशा वाहनांच्या मालकांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

E20 मुळे दुचाकींच्या मायलेजमध्ये घट, इंजिन व इंधन प्रणालीचे नुकसान आणि दुरुस्तीचा वाढता खर्च यांसारख्या समस्या निर्माण होत असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला. मात्र, या तक्रारींचे स्वतंत्र पुरावे किंवा सरकारी आकडे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले नाहीत.


रिक्षा, टॅक्सीचालकांवर परिणामाची भीती

आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास यांनी E20 धोरणाचा सर्वाधिक परिणाम रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट आणि टॅक्सीचालकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली. गोव्यातील ३,५०० हून अधिक रिक्षाचालक आणि ५०० हून अधिक मोटरसायकल पायलट आपल्या वाहनांवर उपजीविकेसाठी अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.


मायलेज कमी झाल्यास इंधनाचा खर्च वाढेल आणि वाहनांच्या दुरुस्तीचा अतिरिक्त भार या चालकांवर पडेल, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे E20 धोरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन ‘आप’ने केले.


दरम्यान, E20 विरोधात पक्षाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय टाउनहॉलमध्ये सात लाख लोक सहभागी झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. सक्तीचे E20 धोरण मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले; मात्र पंतप्रधानांनी भेट नाकारल्याचेही त्यांनी सांगितले.


“गोव्यात भाजपचा पराभव झाल्यास केंद्र सरकारवर E20 धोरणाचा फेरविचार करण्यासाठी दबाव निर्माण होईल,” असा दावा करत केजरीवाल यांनी गोमंतकीयांना आगामी निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!