
इराणबाबत ट्रम्प यांचा कठोर इशारा; लष्करी कारवाई, आर्थिक दबाव की करार?
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील पुढील पाऊल लवकरच ठरवले जाण्याचे संकेत दिले आहेत. इराणने आपली भूमिका बदलली नाही तर मोठ्या घडामोडींना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
फॉक्स न्यूजच्या प्रतिनिधीशी झालेल्या संभाषणात ट्रम्प यांनी आपण “निर्णयाच्या मोडमध्ये” असल्याचे सांगितले. इराणविरोधात पुढे जाण्यासाठी लष्करी कारवाई, आर्थिक दबाव वाढवणे किंवा वाटाघाटी करून कराराचा मार्ग स्वीकारणे, असे पर्याय चर्चेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेझेश्कियन यांच्याशी भेटीची शक्यता
दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी न्यूयॉर्कला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पेझेश्कियन यांची भेट घेण्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे एकीकडे लष्करी आणि आर्थिक दबावाची भाषा सुरू असताना दुसरीकडे राजनैतिक संवादाची शक्यता कायम असल्याचे दिसत आहे.
इराणकडून सात अटी
याचवेळी इराणने कतारच्या मध्यस्थीमार्फत अमेरिकेसमोर चर्चेसाठी सात अटी ठेवल्याचे सांगितले आहे. त्यात युद्ध थांबवणे, गोठवलेला निधी मुक्त करणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. उर्वरित अटी सार्वजनिक करण्यात आलेल्या नाहीत.
इराणने आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील वाहतुकीवर संघर्षाचा परिणाम होत असून, त्याचा जागतिक ऊर्जा बाजारावरही परिणाम होत आह
संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता
दरम्यान, इराणच्या लष्कराने अमेरिकेकडून नव्या हल्ल्याची तयारी सुरू असल्याचा दावा केला असून, हल्ला झाल्यास कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या प्रादेशिक देशांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशाराही इराणकडून देण्यात आला आहे.
त्यामुळे लष्करी संघर्षाची शक्यता, आर्थिक दबाव आणि संभाव्य राजनैतिक चर्चेचे पर्याय एकाच वेळी समोर असल्याने अमेरिका-इराण संघर्षाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.







