
तोडफोडीनंतर लावली भाजप कार्यालयाला आग
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या दोन माजी नेत्यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात शुक्रवारी शेकडो आंदोलकांनी रस्ते अडवले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करुन हल्लेखोरांनी आग लावली. हावडा-खड़गपूर रेल्वे मार्गावरील दासनगर रेल्वे स्थानकाजवळही लोकांनी निदर्शने केली.
तसेच, पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धुलागढ, पांचाला आणि उलुबेरियामध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग 6 ची नाकेबंदी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांशी झटापट झाली. वृत्तानुसार, उलुबेरियातील भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करुन जाळण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने, शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भाजप कार्यालयात तोडफोड आणि आगीनंतर वस्तू विखुरल्याचे दिसून येतात.
“भाजपच्या दोन नेत्यांना आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तात्काळ अटक करण्यात यावी,” असे एका आंदोलकाने म्हटले आहे. धुलागड आणि पाचलामध्ये जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना (Police) लाठीमार करावा लागला, जिथे आंदोलकांनी प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली आणि जवळपास उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच, दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फुलेश्वर आणि चेंगेल स्थानकांदरम्यान दुपारी 1:22 वाजता आंदोलकांनी हावडा-खड़गपूर सेक्शनवरील ट्रॅक अडवले. बंगाल इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद याहिया म्हणाले की, संघटनेने भाजपच्या (BJP) दोन माजी नेत्यांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरातील मशिदींमध्ये निदर्शने केली होती. ते पुढे म्हणाले की, रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासन मोकळे आहे.