वाई विधानसभेसाठी मला नाही तर ‘यांना’ मिळावी संधी : विश्वजीतराजेंची मागणी
सातारा (महेश पवार) :
फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे यांचा सध्या खंडाळा आणि वाई दौरा सुरू आहे. वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभेसाठी विश्वजितराजे नाईक-निंबाळकर इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना विश्वजितराजे नाईक- निंबाळकर यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे विश्वजितराजे हे वाई व खंडाळ्यात गाठीभेटी घेत असल्यामुळे जुनी समीकरणे नव्याने मांडण्याची त्यांची तयारी दिसत आहे.
मालोजीराजे, शिवाजीराजे त्यानंतर रामराजे यांनी फलटण व खंडाळा एकत्र मतदारसंघ असताना केलेली कामे आणि तेव्हापासून जोडलेली माणसे यांच्या भेटी घेऊन विश्वजितराजे जुनी समीकरणे नव्याने मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळते आहे/ विश्वजीतराजेंनी खंडाळा तालुक्यातील बोरी, आंदोरी, खंडाळा, शिरवळ या भागांत भेटी सुरू केल्या आहेत. राजघराण्याशी तीन पिढ्यांचा संबंध असलेली माणसे व कट्टर कार्यकर्ते यांच्याशी ते विचारविनिमय करत आहेत.
विश्वजितराजे यांनी वाई-महाबळेश्वर खंडाळा विधानसभेसाठी चाचपणी सुरू केल्याने या विधानसभा मतदारसंघासाठी समीकरणे बदलतानाचे जरी चित्र असले, तरी विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी सुरू असलेल्या चर्चेला स्वत:च पूर्णविराम देत, वाईतून उमेदवारी मला नाही तर माझ्या मित्राला म्हणजेच दिवंगत खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांना मिळाली पाहिजे असे ‘राष्ट्रमत’ दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
दरम्यान, यशराज भोसले यांनी देखील विश्वजितराजे यांनी माझ नाव वाई विधानसभेसाठी सुचवलं ह्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारा या मतदारसंघामध्ये मोठा गट आहे. जरी पक्षाने रामराजे नाईक निंबाळकर ह्यांच्या कुटुंबातील विश्वजितराजे ह्यांना उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांचं काम मनापासून करू शेवटी शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असेही यशराज यांनी सांगितले.