google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

‘जनतेच्या प्रगतीचा मोदी पॅटर्न, बाकी सगळे पॅटर्न भंगारात’

काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न भंगारात गेलेत अशी तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर डागली.

महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूर येथील गरुडा चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतुर दिसत आहे. आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथे मोठा जनसागर लोटला आहे. काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षांपूर्वीच लातूरकरांनी उद्धवस्त करून टाकला. महायुतीचा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी सेट केला आहे. आता लातूर जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील.

मेरे शरीर का हर कण मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है, असे पंतप्रधान आपल्याला सांगतात. ते खरे असून त्याचा आपण दहा वर्षे अनुभव घेतला आहे. २०-२० तास काम करणारे आपले नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ईश्वरी कृपा असून त्यांच्याकडून ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्याकडे व्हिजन आहे. त्यांच्याकडे मतांचे राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्यांच्याकडे रोडवर फिरून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. आपल्याकडे समृद्धीची धोरणे आहेत. त्यांच्याकडे न उगवणारे बेरनं आहे, असा टोला लगावला.

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी टू जी स्कॅम, स्पेस घोटाळा, कोळसा घोटाळा, नॅशनल हॅराल्ड स्कॅम अशी घोटाळ्यांची मालिका ऐकत होतो. आता केंद्र सरकारच्या योजनांचा बोलबाला ऐकतो आहोत. त्यामुळे खरी गरिबी हटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे काम सुरु आहे. लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाण्यासाठी आता जनतेला वणवण फिरावे लागणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


विरोधक संविधान धोक्यात आल्याचे बोलत आहेत. पण पंतप्रधानांनी संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे सांगितले आहे. जय श्रीराम म्हटल्यावर रावणाच्या सैन्यातील राक्षसांना राग यायचा. तसाच राग आता विरोधकांना येत आहे. तेच लोक आता मुह मे राम बगल मे चुरी घेऊन फिरत आहेत. मतदार त्यांना थारा देणार नाहीत. जो राम का नहीं वो किसी काम नही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान

आपल्या देशाने ३० वर्षे अस्थिर सरकारे बघितली आहेत. त्यांच्या काळात झालेली देशाची अधोगती आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार बघितला आहे. अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु, गेल्या १० वर्षांत या देशाने स्थिर सरकार बघितले आहे. देशाला स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटात आहे. त्यांचा उद्देश जनतेची आणि देशाची सेवा करण्याचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!