‘का’ होतोय विकास आराखडय़ाविरोधात पंढरपुरात आत्मक्लेष आंदोलन?
राज्य मंत्रिमंडळाने पंढरपूर विकासाचा सर्वंकष आराखडा सादर करण्याचे आदेश देताच, पंढरपूर येथील मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांनी कॉरिडॉरला विरोध दर्शविला. विठ्ठल मंदिराजवळ आज या आराखडय़ाविरोधात आत्मक्लेष आंदोलन केले. सरकारने विकास आराखडा रद्द करावा; अन्यथा माघी यात्रेनंतर मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
पंढरपूर शहरात येणाऱया भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, म्हणून शासनाने विकास आराखडा (कॉरिडॉर) करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, यामध्ये मंदिर परिसरातील अनेक घरे, दुकाने पाडली जाणार असल्याने नागरिकांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवला आहे. गेल्या वर्षी शासनाने पंढरपुरात कॉरिडॉर करणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्याला नागरिकांनी विरोध करून मोर्चा, आंदोलने केली.
कॉरिडॉर होऊ नये म्हणून हजारपेक्षा जास्त लोकांनी तक्रार अर्ज दाखल केले होते. त्यानंतर कॉरिडॉरची चर्चा थंडावली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी पंढरपुरात कॉरिडॉर करण्यावर शिक्कामोर्तब केले. कॉरिडॉर बनविताना घरे आणि दुकाने पाडली जाणार असल्याची भीती नागरिकांसह व्यापाऱयांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांनी कॉरिडॉरला विरोध करीत विठ्ठल मंदिराजवळ आत्मक्लेष आंदोलन केले. यामध्ये रा. पा. कटेकर, व्यापारी संघाचे नेते बाबा महाजन बडवे यांच्यासह व्यापारी, नागरिक सहभागी झाले होते.