google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसिनेनामा 

‘निर्भय बनो’त भाषण केलेल्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

पुणे | 10 फेब्रुवारी 2024 : काल पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘निर्भय बनो’ या सभेचं काल आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी संबोधित केलं. ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यासह अन्य वक्ते या कार्यक्रमात बोलते झाले.

अभिनेत्री ॲड. रेश्मा रामचंद्र हिनेही या कार्यक्रमात आपलं मत मांडलं. या कार्यक्रमाला जाताना नेमकं काय घडलं? याबाबत रेश्माने सविस्तर पोस्ट लिहिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातून कशी वाट काढली याबाबत रेश्मा बोलती झाली. या कार्यक्रमानंतर निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडी तोडफोडही करण्यात आली. सगळ्या घटनेनंतर रेश्माच्या फेसबुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

रेश्मा रामचंद्रची पोस्ट :

मी बोलत राहणार आहे!

काल निर्भय बनो च्या मंचावर मला बोलण्याची संधी मिळाली. एका पुरोगामी विचार मंचावर, सरकारी दडपशाही च्या निषेधार्थ बोलण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.

मी कार्यक्रमाच्या जागी पोचले तेव्हा रस्त्यावर अतिप्रचंड गर्दी होती. Main gate च्या बाहेर भाजप कार्यकर्ते उच्छाद करत होते, तर gate वर काँग्रेस, राष्ट्रवादी(original) चे कार्यकर्ते बंदोबस्तासाठी होते. Main gate च्या बाहेरून , गाडी थांबवून भाजप कार्यकर्त्यांच्या गराड्यात, पोलिसांना, मी आजच्या कार्यक्रमात एक वक्ता आहे हे सांगण्याची मला भीती वाटली. आपल्याला पोलिसांना साधी गोष्ट सांगण्याची भीती वाटण्यासारखी परिस्थिती ह्या भाजप सरकारने नागरिकांवर आणली आहे.

मी तरीही धीर करून, गाडी पुढे नेली, जिथे जागा मिळाली तिथे गाडी लावून मी पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी पायी चालत आले तेव्हा मनात जे काही चाललं होतं ते मी शब्दात मांडू शकत नाही. एकच डोक्यात होतं की आपल्याला आत जायचं आहे, बस्स.

मी त्या भाजप गुंडांच्या मधून सुमडीत आत gate पर्यँत पोचले, तिथे माझा मित्र भूषण लोहार मला भेटला. त्याने काँगेस कार्यकर्त्यांना सांगितलं की त्यांना आत जाऊ दे, त्या बोलणार आहेत आत. मग त्या कार्यकर्त्याने एकाला आमच्यासोबत आत पाठवलं ते थेट स्टेज वर जाणाऱ्या दारापर्यंत. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात मी स्टेज वर जाऊन बसले. सभागृह माणसांनी खच्च भरलेलं बघितलं, आणि मला थोडं जबाबदारीचं भान आलं.

मी बोलायला जाण्याआधी, स्टेज वर उत्पल आणि नितीन वैद्य ह्यांचा संवाद माझ्या कानावर पडत होता. उत्पल अतिशय तणावाखाली वावरत होते. जे काही अपडेट्स मिळत होते त्याने तणाव आणखी वाढत होता आणि त्यामुळे जबाबदारीचं भान आणखी गडद होत होतं.

आपण आत्ता एकदम गळपटून चालणार नाही, इथवर आलोय आता बोलायलाच हवं असं वाटून show must go on च्या उर्मिने मी उभी राहिले, मनातलं जे ठरवलं होतं ते बोलले. त्या नंतर लगेच 5,7 मिनिटात निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी स्टेज वर पोचले. त्यांना सुखरूप बघून, जीवघेण्या हल्ल्यानंतरही धीटपणे बोलताना बघून मला भरून आलं. त्या नंतर तिघांची भाषणं झाली. कार्यक्रम संपला. मी घरी आले. पडल्या पडल्या हल्ल्याचे विडिओ पाहिले. तळमळत झोपले रात्रभर. तणावाने इतकी उच्च पातळी गाठली की मला उलटी झाली पहाटे.

नंतर कधीतरी जाग आली आणि मला अक्षरशः रडू कोसळलं. मी रडून घेतलं. शांत झाल्यावर मला निखिल वागळेंच्या कालच्या भाषणातलं एक वाक्य आठवलं. ते म्हणाले, “माझ्या मनात एक विश्वास आहे, जेव्हा जेव्हा असे हल्ले होतात तेव्हा तेव्हा फुले-आंबेडकरांचे विचारच आपल्याला वाचवतात.”

आपला वैचारिक पाया अजिबात डळमळीत नाही ह्याची मला खात्री पटली. हल्ला पचवलेली माणसं ह्या पायावर घट्ट रोवून उभी राहतात, तर आपण नुसत्या वातावरणाच्या अनुभवाने खचून जाण्याचं काहीच कारण नाही ह्याची जाणीव झाली.

हे असे हल्ले फक्त एका व्यक्तीवर नसतात, त्यांच्या सोबत उभ्या राहू पाहणाऱ्या प्रत्येकाला भीती निर्माण करण्यासाठी असतात. आजवर हे सगळं वाचून, ऐकून माहीत होतं. पण काल मी त्या भीतीच्या वातावरणाची प्रत्यक्ष साक्षीदार होते.

ह्या सगळ्याचा खरा परिणाम असा झाला आहे की, माझ्या मनातली उरली सुरली भीती आत्ता तरी पूर्णपणे निघून गेलेली आहे. कदाचित पुन्हा पुन्हा ही भीती डोकं वर काढेल, पण ती कशी गाडून टाकता येते ह्याची मानसिक युक्ती मला जमलेली आहे. आपण बोलण्याची गरज जास्त ठळक झालेली आहे. इथून पुढे जेव्हा केव्हा मला विचार मंचावर बोलायची, लिहिण्याची गरज वाटेल, संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी बोलणारच हा विश्वास माझ्यात निर्माण झाला आहे.

सभागृहात आणि सभागृहाबाहेर जय भीम चे नारे ऊर्जा देणारे होते. माझ्या सारख्या privileged सुरक्षित वातावरणात वाढलेल्या, नुसतं वाचून वैचारिक भान आलेल्या सामान्य मुलीला लोकांमध्ये येऊन विचार मांडण्याचं बळ मिळालं. माणूस म्हणून हा माझा विकासच झालेला आहे. चांगला समाज निर्माण करण्यासाठीची माणूस म्हणून असलेली जबाबदारी यथाशक्ती पार पाडत राहणार. मी बोलत राहणार आहे.

जय भीम!

https://www.facebook.com/reshma.gokhale.3/posts/10225623816290738?ref=embed_post

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!