गणेशोत्सवासाठी इएसजीत ‘चवथीचो बाजार’
पणजी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील पारंपरिक कला, खाद्यपदार्थ आणि उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) यांच्या वतीने ‘चवथीचो बाजार’चे आयोजन करण्यात आले आहे. पणजी येथील मल्टिप्लेक्स कोर्टयार्ड येथे १० ते १२ सप्टेंबर २०२६ दरम्यान हा बाजार भरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच शिवोली मतदारसंघाच्या आमदार आणि ESGच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बाजारात गोव्यातील कारागीर, स्वयं-सहायता गट तसेच स्थानिक उद्योजक सहभागी होणार असून, गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नागरिकांना गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
‘चवथीचो बाजार’मध्ये सजावटीच्या वस्तू, मखर, सणासुदीचे खाद्यपदार्थ, पूजासाहित्य, गोव्यातील पारंपरिक घुमट व शामेल वाद्ये, माटोळीचे साहित्य, गणेशमूर्तींसाठी दागिने, पर्यावरणपूरक वस्तू, फॅशन व परिधान साहित्य तसेच गणेशोत्सवाशी संबंधित अन्य उत्पादनांचे स्टॉल्स असतील.
गोव्याच्या पारंपरिक संस्कृतीशी जोडलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि स्थानिक कारागीर व उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे थेट ग्राहकांपर्यंत सादरीकरण करता यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिकांनी या बाजाराला भेट देऊन स्थानिक उत्पादने आणि पारंपरिक वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



