महाराष्ट्र

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या ‘युवक क्रांती दला’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी (वय ८५) यांचे शनिवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डाॅ. ऊर्मिला सप्तर्षी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

डॉ. सप्तर्षी यांना मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डाॅ. सप्तर्षी यांच्या पार्थिवावर सोमवारी (२० जुलै) वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी कोथरूड येथील गांधी भवन येथे सकाळी दहा ते बारा या वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

समाज परिवर्तनाची चळवळ उभारणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी आपल्या आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला. युवकांना संघटित करून सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली होती. युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली. ते केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर ते एक प्रभावी लेखक, अभ्यासू विचारवंत आणि वक्ते म्हणूनही ओळखले जात होते. समाजातील विषमता, अन्याय, भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्यावर महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारधारेचा प्रभाव होता.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण विकास, शैक्षणिक सुधारणा, युवकांचे सक्षमीकरण आणि लोकशाही हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानांतून अनेक पिढ्यांना वैचारिक दिशा मिळाली. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी विविध पुस्तके, लेख आणि भाषणांमधून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले. समाजकारणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक आणि परिवर्तनवादी होता. त्यामुळेच ते युवकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनले होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!