‘गुवाहाटीला गेल्यानंतर लोकांचा आमच्याबद्दलचा दृष्टीकोन बदलला’
मुंबई:
“राजकारणात तडजोडी कराव्या लागलात. मात्र, गुवाहाटीला गेल्यानंतर लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. या तडजोडीचे दुष्परिणाम भोगावे लागले”, असेही कडू यावेळी म्हणाले. “राजकारणात या तडजोडी असतातच. या तडजोडी फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या तडजोडी केल्या होत्या. मुघलांना शह देण्यासाठी निजामांना हाती पकडावचं लागलं”, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. आमदारांमध्ये गटबाजी होत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. यावर शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. “खोकेवाले आमदार म्हटलं जात असल्यानं वेदना होतात. शिंदे गटातील ५० आमदारांचं ते दु:ख आहे. त्याबाबत काही आमदारांनी मला फोन करत यातून मोकळं होण्याची इच्छा व्यक्त केली होती”, असे स्पष्टीकरण कडू यांनी दिले आहे.
“टाकीवर चढल्याने आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे. मग भिडू म्हणत होते. काही ठिकाणी अपंगांचा कैवारी म्हणत होते. आता त्यात खोका आल्यानं वेदना होतायत” अशी भावना यावेळी कडू यांनी व्यक्त केली. “राजकारणात कोणासोबत गेल्यानं पैसेच घेतले, असा त्याचा अर्थ होत नाही. राणा आधी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. मग त्यांनी खोके घेतले असं आम्ही म्हणायचं का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरत आहे. पैसे घेऊन बच्चू कडूंनी सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडूंनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, एक तारखेचा अल्टिमेटमही त्यांनी दिला आहे. या काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.