सिनेनामा 

‘डार्क पॉप’ची आवड आली कामी; ‘टॉक्सिक’मधील गाण्याबद्दल हनिताने सांगितला खास किस्सा

गायिका-गीतकार हनिता भांबरी हिच्यासाठी ‘टॉक्सिक’ हा चित्रपट केवळ एका गाण्यापुरता मर्यादित राहिलेला अनुभव नाही. यश अभिनीत या चित्रपटातील इंग्रजी गाण्यासाठी तिने गीतलेखन केले असून, विशेष म्हणजे तिनेच या गाण्याला आपला आवाजही दिला आहे. सुरुवातीला केवळ गीत लिहिण्यासाठी संपर्क करण्यात आलेल्या हनिताला संगीतकार विशाल मिश्रा यांनी तिचा आवाज ऐकल्यानंतर गायनाची संधी दिली.


“सुरुवातीला मला केवळ गाण्याचे बोल लिहिण्यासाठी घेण्यात आले होते. पण सादरीकरणाच्या वेळी विशाल मिश्रा यांना माझा आवाज आवडला आणि त्यांनी मला गाणे गाण्यासाठी प्रोत्साहित केले,” असे हनिताने सांगितले.


विशाल मिश्रा यांनी त्यानंतर ‘टॉक्सिक’च्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्याशी फोनवर संपर्क साधला. “त्यांनी गीतू मॅडमना फोन केला आणि स्पीकरवर ठेवून मला त्यांच्यासमोर गाणे गाण्यास सांगितले. माझा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी मला गाणे रेकॉर्ड करण्याची परवानगी दिली,” असे तिने सांगितले.


‘गाण्याचा मूड डार्क, मोहक आणि धोकादायक होता’

गीतू मोहनदास यांना गाण्यात एकाच वेळी गडद, मोहक आणि धोकादायक भाव हवा होता. त्याचबरोबर गाण्याला भव्य आणि सिनेमॅटिक स्वरूप देण्याची अपेक्षा होती. या संकल्पनेशी आपली संगीताची आवड लगेच जोडली गेल्याचे हनिताने सांगितले.

“मानवी भावनांच्या गुंतागुंतीच्या आणि अस्वस्थ करणाऱ्या बाजूंचा शोध घेणाऱ्या संगीताकडे माझा नेहमीच कल राहिला आहे. ‘टॉक्सिक’ने मला त्या भावनांशी खेळण्यासाठी भरपूर वाव दिला,” असे ती म्हणाली.

गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी हनिताने त्याच्या व्यक्तिरेखेत शिरण्याचा प्रयत्न केला. आत्मविश्वास, खेळकरपणा आणि धोक्याची जाणीव हे गाण्याच्या सादरीकरणातील महत्त्वाचे पैलू होते. काही भागांमध्ये तिने संवादात्मक पद्धतीने आवाजाचा वापर केला, ज्यामुळे गाणे श्रोत्याशी थेट संवाद साधत असल्याचा भास निर्माण होतो.


विशाल मिश्रांकडून शिकले ‘रेकॉर्डिंगचे बारकावे

विशाल मिश्रा यांच्यासोबत काम करताना रेकॉर्डिंगमधील छोट्या-छोट्या गोष्टींचे महत्त्व समजल्याचे हनिताने सांगितले.

“एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करायचा, कुठे श्वास घ्यायचा, एखाद्या ओळीत किती अॅटिट्यूड आणायचा किंवा कुठे संयमित राहायचे, अशा छोट्या गोष्टी गाण्याची भावना पूर्णपणे बदलू शकतात,” असे ती म्हणाली.

‘टॉक्सिक’सारख्या मोठ्या चित्रपटाचा भाग असल्याची जाणीव असतानाही रेकॉर्डिंगच्या वेळी प्रकल्पाच्या भव्यतेचा दबाव स्वतःवर येऊ न देण्याचा प्रयत्न केल्याचे हनिताने सांगितले.

“या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळत आहे, हे स्वीकारायलाच मला बराच वेळ लागला. पण रेकॉर्डिंग करताना या प्रकल्पाच्या भव्यतेचा फार विचार न करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी या गाण्याचा अर्थ काय आहे, यावर लक्ष केंद्रित केले आणि गीतलेखन तसेच गायनात माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला,” असे तिने नमूद केले.


‘डार्क पॉप’शी असलेले नाते

हनिताचा स्वतंत्र संगीताचा प्रवासही ‘टॉक्सिक’च्या गाण्याशी जोडलेला आहे. तिचा ‘शोहरत’ हा अल्बम डार्क-पॉपच्या धाटणीचा असून, तिच्या स्वतंत्र संगीतामध्ये वेड, हृदयभंग, राग, इच्छा, सूड आणि गुंतागुंतीची नाती अशा विविध भावनांचा शोध घेतला गेला आहे.

“डार्क पॉपबद्दलची माझी आवड आणि आकर्षण यामुळे हा प्रकल्प माझ्यासाठी अगदी योग्य जुळणारा अनुभव ठरला,” असे हनिताने सांगितले.

या गाण्यासाठी गीतू मोहनदास आणि विशाल मिश्रा यांनी आपल्याला पूर्ण सर्जनशील स्वातंत्र्य दिल्याबद्दलही तिने त्यांचे आभार मानले.

“गाणे लिहिण्यासाठी आणि माझी कलात्मकता व्यक्त करण्यासाठी मला पूर्ण सर्जनशील स्वातंत्र्य मिळाले. गाण्यात माझा एक भाग आणण्यासाठी जागा दिल्याबद्दल विशाल आणि गीतू या दोघांचीही मी अत्यंत आभारी आहे,” असे हनिता म्हणाली.


स्वतंत्र कलाकारांसाठी नव्या संधींची आशा

‘टॉक्सिक’सारख्या चित्रपटांमुळे स्वतंत्र संगीतविश्वातील कलाकारांसाठी मुख्य प्रवाहातील सिनेमात अधिक संधी निर्माण होतील, अशी आशा हनिताने व्यक्त केली.

“स्वतंत्र संगीत आणि मुख्य प्रवाहातील संगीत यांच्यातील सीमारेषा अधिकाधिक धूसर होत आहेत आणि ही गोष्ट खूप उत्साहवर्धक आहे,” असे ती म्हणाली.

‘टॉक्सिक’च्या अनुभवाने भविष्यात आणखी मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ मिळाल्याचेही हनिता सांगते. “मला माझे स्वतःचे वैशिष्ट्य जपणारे संगीत लिहित आणि तयार करत राहायचे आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विश्वांचा आणि कलाकारांचा शोध घ्यायचा आहे. ते डार्क पॉप असू शकते, रॉक किंवा ब्लूजही असू शकते; जोपर्यंत ते माझे आहे आणि मनापासून आलेले आहे, तोपर्यंत मला कोणतीही शैली चालेल. माझ्या नव्या पर्वासाठी मी खूप उत्सुक आहे,” असे तिने सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!