अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका अतुलने साकारली आणि पु.ल. देशपांडे यांनी ती पाहिली आणि अतुलला शाबासकी दिली होती. अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, त्यातूनही तो बाहेर आला होता, त्याच्या जिद्दीचं कौतुक झालं होतं. आज त्याची प्राणज्योत मालवली आहे. त्याच्या मागे त्याची आई, पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे. नाटक, सिनेमा, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अतुलला कर्करोग झाला हे ऐकून अनेकांना धक्का बसला होता. त्याने त्याच्या वेदना विविध मुलाखतींमध्ये सांगितल्या होत्या. अशात आता वेदना देणारी ही बातमी समोर आली आहे.
अतुल परचुरेने त्याच्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर रंगभूमी, छोटा पडदा, मालिका विश्व सगळंच गाजवलं. परचुरे यांना कर्करोग झाला होता. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.
अतुल परचुरे यांनी जिगरबाज वृत्तीनं कॅन्सरवर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. मराठी रंगभूमीवर पुन्हा दाखल झालेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातही त्यांची भूमिका होती. पण, कॅन्सरनंतरची त्यांची इनिंग दुर्दैवानं फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.
अभिनेता अतुल परचुरेने काही महिन्यांपूर्वी एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. त्यात कर्करोगाशी कसा लढा दिला हे सांगितलं होतं. अतुल म्हणाला होता, “सिटी स्कॅन करण्यासाठी डॉक्टरांकडे गेलो तेव्हाही डोक्यात नव्हतं की आपल्याला कॅन्सर वगैरे असेल. सिटी स्कॅन केल्यानंतर मला डॉक्टर म्हणाले उद्या आपण MRCP करु. मी त्यांना विचारलं डॉक्टर सांगा ना काय झालं आहे? तर डॉक्टर म्हणाले उद्या कळेलच आपल्याला सगळं. ती टेस्ट केली, त्यानंतर मला समोर बसवलं. ते मला म्हणाले की आता वारंवार काही शब्द ऐकायची तयारी ठेवा. डॉक्टर मला म्हणाले की तुमच्या लिव्हरमध्ये आम्हाला एके ठिकाणी ट्युमर दिसतो आहे. तो ट्युमर साधारण पाच सेमीचा आहे. तुम्ही काळजी घ्या. मी तेव्हा त्यांना विचारलं की मॅलिग्नंट आहे का? म्हटलं म्हणजे कॅन्सर झाला आहे का? तर ते म्हणाल हो. मी त्यांना विचारलं की मी यातून बाहेर पडू शकतो का? तर डॉक्टर मला म्हणाले की मी तू बाहेर पडशील पण माझ्यापेक्षा तुला कॅन्सर स्पेशालिस्ट हे जास्त चांगल्या पद्धतीने चांगलं सांगतील. त्यानंतर मी ते रिपोर्ट घेऊन घरी आलो. सोनियाला मी सांगितलं होतं की ट्युमर वगैरे आहे.”
पुढे अतुल म्हणाला होता, “घरी आल्यानंतर मी सर्वात आधी आईला सांगितलं. डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की कॅन्सर आहे. तर आई म्हणाली हो? मग डॉक्टर काय म्हणाले? मी आईला सांगितलं की डॉक्टर म्हणत आहेत की दोन-तीन प्रोसिजर्स आहेत ते झालं की तुमच्या लिव्हरची साईझ वाढेल मग आपण ते काढून टाकू. काढून टाकू म्हणालेत ना डॉक्टर मग लक्षात ठेव तुला काहीच होणार नाही काळजी करु नकोस मला आईने सांगितलं. सोनियाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं तेव्हा ती पण हेच म्हणाली की तुला काहीच होणार नाही. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली की तुमची कशावर तरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, स्वामी समर्थांवर असो, येशूवर, अल्लावर कुणावरही असो पण ती हवी आणि १०० टक्के हवी. माझी आई, बायको आणि माझी मुलगी या माझ्या तीन सपोर्ट सिस्टिम आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे.” असं अतुल परचुरे म्हणाले होते. कर्करोगाशी इतका हिंमतीने लढणारा माणूस आज आपल्याला सोडून निघून गेला आहे.