पणजी (विशेष प्रतिनिधी) :
गेल्या शंभर वर्षांत सिनेमाने अनेक बदल करून मार्गक्रमण केले आहे. प्रत्येक नवी पिढी आपापले नवे तंत्रज्ञान घेऊन सिनेमात वेगवेगळे प्रयोग करत असते. गेल्या काही वर्षापासून अवस्थेत तंत्रज्ञानाला मिळत असलेला जगभरातला पाठिंबा आणि त्याच वेळेला नागरिकांना या तंत्रज्ञानाचा असलेला ओढा लक्षात घेता भविष्यात अशा पद्धतीची सिनेमे निर्माण होतील की ज्यामध्ये सिनेमे पाहताना प्रेक्षकच त्यातील एक कलाकार आहे असे भासत राहुन तो त्या कथेचा एक भाग होऊन जाईल, असे भाकीत जगप्रसिद्ध संगीतकार आणि भारतातील आभासी तंत्रज्ञानाची म्हणजेच वर्चुअल रियालिटीची रुजवण करणारे निर्माते ए आर रहमान यांनी केले. इफ्फीमध्ये आयोजित विशेष परिसंवादात ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर, ड्रीम्सस्केप या बहुराष्ट्रीय कंपनीचे रोनाल्ड मेनेजेल, नियॉनचे प्रणव मिस्त्री यांनी या परिसंवादामध्ये सहभाग नोंदवला. नव्या तंत्रज्ञानांसोबत जुळवून घेताना मानवी भावभावना आणि नैतिकता यांचा पाया बळकट असणे नितांत गरजेचे आहे. असेही यावेळी रेहमान यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शेखर कपूर यांनी सांगितले की आपल्या जगण्याच्या सगळ्या बाजू या खऱ्या अर्थाने आभासी आहेत. आणि त्या अभासालाच आपण आता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिनेमाच्या पडद्यावरती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया क्रांतिकारी नक्कीच असू शकते. कारण आजवर आपण दुमिती, त्रिमिती अशा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सिनेमाचे जग पडल्यावर अनुभवत होतो. मात्र आता आभासी तंत्रज्ञानाने आपण सिनेमातल्या कलाकारांना प्रत्यक्ष सिनेमा बघताना अनुभव शकणार आहोत. सिनेमात असलेल्या फुलांचा वास, फुलांचा रंग, कपड्याचा पोत आदींसह इतर अनेक बाबी प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत. सिनेअनुभव हा आता भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने समृद्ध, संपन्न करणारा ठरू शकतो.
‘…तर कदाचित अल्गोरिदम जिंकू शकेल ऑस्कर’
आभासी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे सध्यकाळातील वाढत चाललेले प्रस्थ पाहता आणि त्यातील निपुणता पाहताना भविष्यात कदाचित असे होऊ शकेल, की सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ऑस्कर म्हणजे अकॅडमी अवॉर्ड हा अलगोरीदमला मिळू शकतो. अशी विलक्षण टिप्पणी प्रणव मिस्त्री यांनी केली.
‘आय एम द ए. आय.’
व्यापारी संवादामध्ये जेव्हा यांना विचारण्यात आले की अशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता जर मानवाचे स्थान घेण्यासाठी सज्ज झाली आहे तर भविष्यामध्ये सर काहीच बोलणार नाही मग ए आर रहमान तरी अस्सल राहणार का? असे विचारलं असता रहमान यांनी एका दमात सांगितले की ए आय आणि ए आर हे काळानुरूप वाढत, बदलत आणि समृद्ध होत गेले आहेत. त्यामुळे आम्हा दोघांत तसे काही वेगळेपण नाही. मी स्वतच ए आय आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
माझ्यासाठी संगीत हे माझ्या रिकामी मनातून आत पाझरते आणि तिथून ते बाहेर येते. कोणतीही कलाकृती परिपूर्ण होण्यासाठी रिते होणे गरजेचे असते. रिती मने विश्वाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात एकमेकांसोबत संवाद साधतात. आणि त्यातूनच कलाकृती साकार होते. त्यामुळे मन हेच माझे विश्व आहे.
– ए आर रेहमान,
जगप्रसिद्ध संगीतकार.