
IFFI 2025: ‘..पुन्हा अभिनेता म्हणून जन्म मिळावा’!
तृतीयपंथीय व्यक्तींच्या जीवनात शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या कराव्या लागणाऱ्या संघर्षावर आधारीत दिग्दर्शक ॲश्ली मेफेयर यांनी साकारलेल्या ‘स्कीन ऑफ युथ’ ने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पटकाविला.
दरम्यान, श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री एल.मुरूगन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जीवन पुरस्कार प्राप्त अभिनेते रजनीकांत, रणवीर सिंह, ऋषभ शेट्टी, रवी किशन, शेखर कपूर, किशोर कदम, रमेश सिप्पी, डॉ. किरण शांताराम, नवाजुद्दीन सिद्दीकी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दिलायला लोबो, चंद्रकांत शेट्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गोवा हे चित्रपट निर्मिती आणि कलाक्षेत्रातील प्रतिभांसाठी जागतिक दर्जाचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून गोवा तरुण कलाकारांना प्रशिक्षण देणारे आणि त्यांना घडविणारे एक सक्षम केंद्र बनवण्याचा मानस आहे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्याने इफ्फीला एक महत्त्वाचे जागतिक सांस्कृतिक चिन्ह म्हणून जोपासले आहे. येथे कल्पना विकसित होतात, कलात्मक देवाणघेवाण फुलते आणि सर्जनशीलतेला नवी ऊर्जा मिळते. गोवा जागतिक चित्रपट विश्वात उदयाला येत असून भविष्यातही या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.





