‘लघुपटांसाठी फिल्म बझार महत्वाचे केंद्र’
पणजी :
पूर्ण लांबीच्या सिनेमाप्रमाणेच इफि आणि फिल्म बझारमध्ये लघुपटांनादेखील उत्तम प्रतिसाद दरवर्षी लाभत असतो. त्यामुळे देशभरातील लघुपट निर्माते आपापले लघुपट या महोत्सवातील विविध विभागात पाठवत असतात. आम्हीदेखील खूप अपेक्षेने महोत्सवाला आमचे चार लघुपट पाठवले होते आणि त्या चारही लघुपटांना देश-विदेशातील सिनेकर्मीनी खूप चांगला प्रतिसाद देत आमची उमेद वाढवली. त्यामुळे पुढील वर्षासाठीही फिल्म बझार आणि इफिमध्ये सहभागी होण्यासाठी आमचा सगळ्यांचा उत्साह वाढला आहे. असे प्रसिद्ध छायाचित्रकार आणि या लघुपटांच्या माध्यमातून नव्याने दिग्दर्शकीय कौशल्य आजमावणाऱ्या नंदू धुरंदर यांनी नमूद केले.
यावर्षी “मार्केट स्क्रीनिंग” आणि “विव्हिंग रूम” करता गामा फाऊंडेशन फिल्म्सने प्रथमच स्वतःची निर्मिती आणि छाया प्रॉडक्शनची सहनिर्मिती असलेल्या फ्रेंच फ़्राईस, पँडेमिक द ब्राइट साइड, स्पेशल पेन्टिंग, लुडो क्वीन अशे चार मराठी लघुपट पाठवले होते. या लघुपटांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना धुरंधर यांनी सांगितले कि, फिल्म बाजार हा नव्याने सिनेनिर्मिती करू इच्छिणाऱ्या आमच्यासारख्या नवोदित सिनेकर्मीसाठी खूप महत्वाचे केंद्र आहे.
यातील फ्रेंच फ़्राईस, पँडेमिक द ब्राइट साइड या लघुपटाचे दिग्दर्शन अमृता देवधर यांनी तर स्पेशल पेन्टिंग, लुडो क्वीन या लघुपटाचे दिग्दर्शन नंदू धुरंधर यांनी केले आहे. तर हे लघुपट अमृता देवधर आणि कल्पना राणे यांनी लिहिले आहेत. महोत्सवाला दिग्दर्शक अमृता देवधर आणि नंदू धुरंधर आणि छाया प्रॉडक्शनचे संदीप कामत उपस्थित होते.