दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्कारासाठी ‘जिप्सी’ आणि ‘35 चिन्ना कथा काडू’ यांच्यात चुरस
गोवा येथे सुरु असलेल्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित रौप्य मयूर पुरस्कारासाठी ‘जिप्सी’ आणि ‘35 चिन्ना कथा काडू’ यांच्यात स्पर्धा दिसून आली.
जिप्सी चित्रपटाचे दिग्दर्शक शशी चंद्रकांत खंदारे आणि निर्मात्या श्रद्धा शशी खंदारे तसेच प्रमुख भूमिका निभावणारा अभिनेता कबीर खंदारे यांनी भटक्या जमातीमधील कुटुंबाच्या जगण्याच्या संघर्षाचे लक्षवेधी वर्णन करणाऱ्या या चित्रपटाबाबत मौलिक विचार मांडले. “अनेक समुदायांसाठी अजूनही अप्राप्य असलेल्या मूलभूत गरजांच्या समस्येबाबत हा चित्रपट विचार करायला लावतो आणि ‘जोड्या’ या लहान वयाच्या नायकाच्या दृष्टीला दिसणाऱ्या संवेदनात्मक विशेषतः गंधांच्या अनुभवांच्या माध्यमातून मूल्यांचा शोध घेतो, खंदारे म्हणाले.
प्रसारमाध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना, 35 चिन्ना कथा काडू या चित्रपटाचचे दिग्दर्शिक नंदकिशोर इमानी यांनी तर्क आणि भावना यांची गुंफण असलेले हृदयस्पर्शी नाट्य असे या तेलुगु चित्रपटाचे वर्णन केले. ते म्हणाले, “गणित शिकणाऱ्या एका लहान मुलाच्या भोवताली फिरणारी ही कथा असून या मुलाच्या कुतुहलामुळे त्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील भावनिक आयाम प्रकाशात येतात. या मुलाचे पालक, विशेषतः निवेदिता थॉमस यांनी रंगवलेली त्याची आई, परिणामापेक्षा प्रगती अधिक महत्त्वाची यावर भर देत या मुलाची शैक्षणिक आव्हाने कसे पार करतात याचे सुंदर चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.”
अभिनेत्री निवेदिता थॉमस यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वठवलेल्या पात्राच्या खोलीवर अधिक भर दिला. “सरस्वती ही केवळ एक आई नाही तर ती त्याग आणि बिनशर्त प्रेमाचे प्रतीक असून भारतीय मातृत्वाच्या भावनेचे सार प्रतिबिंबित करणारी आहे. सामाजिक अपेक्षांची पूर्तता करतानाच लहान मुलांमधील कुतुहल जोपासण्यात समतोल साधणारे हे पात्र माझ्या मनात खोलवर रुजले,” त्या म्हणाल्या.
अभिनेता विश्वदेव रचकोंडा याने चित्रपटामधील गुंतागुंत अधोरेखित केली. “35 चिन्ना कथा काडू हा चित्रपट प्रेम, शिक्षण आणि कौटुंबिक नातेसंबंध यांच्या संकल्पनांची गुंतागुंत दाखवतानाच समर्पक आणि अस्सल पद्धतीने जटील मानवी आयामांचा शोध घेतो,” त्याने पुढे सांगितले.
हे दोन्ही चित्रपट अर्थगर्भ कथांना मनोरंजनाची जोड देऊन त्यांच्या निर्मात्यांची कथाकथनाविषयीची वचनबद्धता दर्शवतात. वैविध्यपूर्ण कथांचे जागतिक मंचावर सादरीकरण करण्यात या महोत्सवाची भूमिका अधोरेखित करत, चित्रपट निर्मितीसंदर्भातील कार्याचा सन्मान केल्याबद्दल उपस्थित दिग्दर्शकांनी इफ्फी परीक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली