‘मोहब्बतपुराचे स्वप्न घेऊनच फॅसिझमचा पराभव करणे शक्य’
कोल्हापूर :
आजचा काळ हा स्वप्न हरवलेला काळ आहे. स्वप्न पाहण्याचीही भीती वाटावी इतका हिंसक आपल्या दारात येऊन उभा ठाकला आहे. अशावेळी गंगाजमनी परंपरा बळकट करत मोहब्बतपुराचे स्वप्न घेऊनचं फॅसिझमचा पराभव करणे शक्य आहे, त्यासाठी प्रसंगी गोळ्या झेलण्याची तयारी ठेवावी लागेल अशी भूमिका डॉ भारत पाटणकर यांनी आज कोल्हापूरात हिंदी है हम.. हिंदोस्ता हमारा संघटनेच्या पुढाकाराने आणि सर्व डाव्या पक्ष संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या गंगाजमनी मोहब्बतपुरा संकल्प परिषदेत मांडली.
ते पुढे म्हणाले कि या देशातील कोणाही व्यक्तीला विकासापासून वंचित न ठेवण्याची आणि भयमुक्त समृध्द जगण्याची हमी बाबासाहेबांच्या मूळ घटनेच्या (जी पूर्णतः स्वीकारली नाही) सरनाम्याने दिली होती. त्या सरनाम्याच्या आणि आजच्या संविधानाच्या संरक्षणासाठी आपल्याला हातात हात घालून लढावे लागेल. राजर्षी शाहू राजांच्या या नगरीतून मोहब्बतपुरा चळवळीची आज सुरवात होत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात परिषदा घेऊन हि चळवळ देशव्यापी बनविण्याचा संकल्प आपण करूया.
या परिषदेचे मुख्य निमंत्रक हुमायून मुरसल यांनी सर्वांचे स्वागत करून या परिषदेमागील भूमिका मांडली. ते आपल्या भाषणात म्हणाले कि बुध्द, चार्वाक, महावीर, लिंगायत, वारकरी, सुफी अशी प्रेमावर आधारलेली सहिष्णू आणि सौहार्दाची मोठी परंपरा या देशाला लाभली आहे. बौध्द, जैन, लिंगायत या भारतात जन्माला आलेल्या अवैदिक धर्मानी ब्राम्हणी धर्माला आव्हान देत नवे मुक्तीदायी तत्वज्ञान दिले. या अवैदिक धर्माबरोबरच ख्रिचन, इस्लाम असे धर्मही या मातीत एकरूप होऊन गेले. इस्लामच्या समतेच्या शिकवणी मुळेच हजारो वर्षे इथल्या जातीव्यवस्थेने ज्यांना अमानुष वागणूक दिली त्यामुळे ब्राम्हणी धर्माला सोडून मोठ्या संख्येने इथे धर्मांतरे झाली. बुरसटलेल्या जुन्या विचारांना मुठमाती देत आपली नवी सांस्कृतिक ओळख निर्माण केली. हि धर्मांतरे केवळ सत्ता आणि तलवारीच्या जोरावर नसून ती प्रेम आणि समतेच्या पायावर झाली आहेत. आणि हेच ब्राम्हणी धर्माला कायम डाचत आलं आहे. म्हणून तर मुसलमानांची बदनामी जाणीवपूर्वक चालवली आहे.
आताच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान ते नेपाळ श्रीलंके पर्यंत पसरलेल्या भारतवर्षाची मोहोंजदडो, हडप्पा हि सांस्कृतिक ओळख आहे. या सांस्कृतिक परंपरेनेच इथल्या धर्मांतरित गरीब मुसलमानांचे भरणपोषण झाले आहे. इथला मुसलमान हा या मोहोंजदडो हडप्पा संस्कृतीचा वारसदार आहे. हे सत्य आहे. या गरीब धर्मांतरीत मुस्लीम समाजात स्वतःचे नेतृत्व निर्माण झाले असते आणि त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इथल्या फुले आंबेडकरी चळवळीशी जोडून घेतले असते तर आज भारताचे चित्रच वेगळे दिसले असते. आपल्या मांडणीच्या शेवटाला ते म्हणाले फॅसिझमच्या पराभवासाठी आपल्याला मोहब्बतपुरा चळवळ उभा करावी लागेल. प्रेम आणि समतेचा संदेश अशा परिषदामधून आपल्याला सर्वदूर घेवून जावा लागेल.
प्रा.अतुल दिघे म्हणाले कि हा फॅसिझम कार्पोरेट आहे. आजचे भांडवलदार हे उत्पादक भांडवलदार नसून ते व्यापारी आणि दलाल भांडवलदार आहेत. ब्राम्हण, बनिया जातीतून आलेल्या या भांडवलदारांनी आजचा फॅसिझम पोसला आहे. याचा पराभव केल्याशिवाय आपल्याला मोहब्बतपुराच्या दिशेने जाता येणार नाही.
यावेळी सत्यशोधक जन आंदोलनाचे अंकुश कदम, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे रघुनाथ कांबळे, शेकापचे बाबुराव कदम, संपत देसाई, तन्वी बागवान यांचीही भाषणे झाली. परिषदेच्या सुरवातीला सत्यशोधक सांस्कृतिक जलशा सिंधुदुर्ग आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिगीते सादर केली. आभार विद्रोहीचे गौतम कांबळे यांनी मानले. यावेळी कोल्हापूर शहर, जिल्हा आणि सिंधुदुर्ग येथून मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष कार्यकर्ते आले होते. येत्या कांही दिवसात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गंगाजमनी मोहब्बतपुरा संकल्प परिषदा घेऊन फॅसिझम विरोधी मोहब्बतपुरा चळवळ देशव्यापी करण्याचा निर्धार करण्यात आला.