एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर?
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपच्या प्रस्तावावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वेळ आल्यास बहुमत सिद्ध करु, असा दावा केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपची याबाबत चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मते , महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांची ग्रामीण भागातील ताकद झपाट्याने वाढत आहे. शिवसेनाचा विस्तार होत नाही.
शिवसेनेच्या नेत्यांची कामे होत नाहीत. अन् झाली तर त्याचं श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतात, असा दावाही बंडखोर शिवसेना आमदारांनी केलाय. आज सकाळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, त्यामधून काहीही निष्कर्ष निघाला नाही. शिवसेनाबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी उद्धव ठाकरे यांना अनेकदा सांगितले. पण त्यांच्याकडून कोणताही कठोर निर्णय घेण्यात आला नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय येथे असणारे सर्व आमदार घेतील, फक्त एकनाथ शिंदे हा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी भूमिका तेथील आमदारांची असल्याचं सूत्रांनी सांगितले.