google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

‘मी 20 ते 22 आमदारांशी बोललो पण…’

राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये सुद्धा राजीनाम्याची लाट सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस (Congress) फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रत्यक्ष त्याची ठिणगी पडली गेली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र होती. मात्र, चव्हाण यांनी कोणताही दुजोरा दिला नव्हता. मात्र, आता अशोक चव्हाण यांनी थेट राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये सुद्धा राजीनामास्त्र सुरू झालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत बंडाळी सुरु झाली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर किती आमदार त्यांच्या पाठीशी आहेत किंवा नाराजी आहे का? यासंदर्भात आता पक्षाकडून काळजी घेतली जात आहे.

काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी (Satej Patil on Ashok Chavan) अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाणं हे मोठं नुकसान आहे. आम्ही तरुण काँग्रेसच्या विचारांचा झेंडा पुढे घेऊन जाऊ. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याची भूमिका काय याबाबत माहिती नाही. ते पुढे म्हणाले की, मी सकाळपासून वीस ते 22 आमदारांशी बोललो. काँग्रेस आमदार जाणार यामध्ये काहीही तथ्य नाही. राज्यात काँग्रेससाठी चांगलं वातावरण असल्यानेच आपण एकत्र लढू, अशी आमदारांची भूमिका आहे.

त्यांनी सांगितले की, काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा सर्व्हे आला. त्यामुळे कुठेतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही एकत्र राहिल्याने महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, महायुतीचा कारभार लोकांना आवडलेला नाही हे सर्व्हेतून समोर आलं आहे. महाराष्ट्रात जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते अजेंडा समर्थपणे घेऊन पुढे जाणार आहोत असं त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, या सगळ्या घटना घडल्यानंतर कोणत्याच निवडणुका झालेल्या नाहीत. नागरिक निवडणुकीत आम्हालाच कौल देतील. आता काँग्रेस म्हणून आम्ही एकसंध राहणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!