…तर प्रादेशिक चित्रपटही अद्वितीय कामगिरी करू शकतात : मिलिंद लेले
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतातील प्रादेशिक सिनेमांचा एक समृद्ध संग्रह प्रदर्शित केला जात आहे. त्यांपैकीच ‘पिरन्थानाळ वाळ्थुकळ’ (तमिळ) आणि ‘दृश्य अदृश्य’ (मराठी) या दोन प्रादेशिक चित्रपटांच्या चमूने आज माध्यमांशी संवाद साधला.
दिग्दर्शक राजू चंद्रा यांनी ‘पिरन्थानाळ वाळ्थुकळ’ (Piranthanaal Vazhthukal) या तमिळ चित्रपटाच्या निर्मितीचा रंजक अनुभव सांगितला. स्थानिक सांस्कृतिक परंपरांमध्ये रुजलेल्या चित्रपटांना, केवळ त्यांच्या स्वतःच्याच समुदायांकडून नाही, तर इतर सांस्कृतिक घटकांकडूनही प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सांस्कृतिक स्वीकारार्हता, चित्रपटाप्रती समर्पण आणि सांघिक कार्य ही यशस्वी प्रादेशिक चित्रपटाची गुरुकिल्ली आहे असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचे मुख्य अभिनेता अप्पुकुट्टी यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी ‘दृश्य अदृश्य’ या आपल्या मराठी चित्रपटाबद्दल सांगितले. हा उत्कंठावर्धक थरारपट आपण केवळ 8 ते 10 सदस्यांच्या छोट्या चमूसह एका निर्जन रिसॉर्टवर चित्रित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. मर्यादित संसाधने असूनही, चित्रपटाच्या चमूतील प्रत्येक सदस्याने समर्पण भावनेने योगदान दिले, त्यामुळेच हा चित्रपट पूर्ण करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असल्याची माहितीही लेले यांनी दिली. एकीकडे मोठ्या बॅनरखालील चित्रपट प्रदर्शित होत असताना, त्यांच्या समोर हा कमी बजेटचा चित्रपट कसा तग धरू शकेल असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी लेले यांना विचारला. त्यावर प्रत्येक चित्रपटाची स्वतःची एक कुंडली असते. शेवटी, प्रेक्षकच चित्रपटाची वाटचाल कशी होईल हे ठरवतात. कथा, दिग्दर्शन आणि अभिनय दमदार असेल तर, प्रादेशिक चित्रपटही अद्वितीय कामगिरी करू शकतात, हे सर्व सांघिक कार्यावर अवलंबून असते. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मोठ्या बॅनरच्या चित्रपटांच्या गर्दीत आता प्रादेशिक सिनेमा केवळ चांगला असून चालणार नाही, तर तो खूप चांगला असणे आवश्यक आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रादेशिक सिनेमातून, तिथल्या लोकांमधील आणि परंपरांमधील खरे सांस्कृतिक सार समजून घेता येते ही बाब त्यांनी अधोरेखित केली.






